26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriमुंबई-गोवा महामार्गावरील सावली हरवली, प्रवाशांचे हाल

मुंबई-गोवा महामार्गावरील सावली हरवली, प्रवाशांचे हाल

रस्त्याच्या बाजूला सावली शोधूनही सापडत नसल्यामुळे उन्हाच्या रखरखात प्रवास.

सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे. या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चिपळूण, खेड परिसरांसह अन्य तालुक्यांत काही ठिकाणी तापमान ४० अंशावर पोहोचलेले आहे. त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर झालेला आहे. या बिघडलेल्या वातावरणाचा फटका मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत आहे. चौपदरीकरणासाठी वृक्षतोड झाल्यामुळे खेड-चिपळूण-संगमेश्वर या परिसरात रस्त्याच्या बाजूला सावली शोधूनही सापडत नसल्यामुळे उन्हाच्या रखरखात प्रवास करावा लागत आहे. महामार्गाच्या कामासाठी रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली आहे. त्यामुळे नैसर्गिक सावली हरवली असून, उन्हाचे चटके वाढत आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नेहमी वर्दळ असते. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने धावतात. मात्र, महामार्गावरील सावली पूर्णपणे हरपल्यामुळे सध्या कडाक्याच्या उन्हातून प्रवास करावा लागत आहे. वाढत्या उष्म्याची झळ सर्वाधिक दुचाकीस्वारांना सहन करावी लागत आहे. दुपारी महामार्गावर शुकशुकाट असतो. स्थानिक लोकं प्रवास करण्यासाठी सकाळ किंवा दुपारची वेळ अवलंबत आहेत. बारा वर्षांपूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. जुन्या महामार्गावर ठिकठिकाणी जवळपास १०० ते २०० वर्षांपूर्वीची जुने वटवृक्ष उभे होते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर सावली होती.

महामार्गावरून प्रवास करणेही सुखावह होते. बारा वर्षांपूर्वी महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर चिपळूण-खेड- संगमेश्वर दरम्यान महामार्गालगत असलेली हजारो मोठमोठी झाडे पूर्णपणे तोडण्यात आली. त्यानंतर महामार्गाचे काम वेगाने सुरू होऊन काम पूर्ण होत आहे. महामार्ग आता पूर्ण मोकळा दिसत असून, सावली हरपली आहे. महामार्गाचे काम झाल्यानंतर दुतर्फा नवीन झाडे लावणे गरजेचे होते; मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या महामार्गावरून प्रवास करताना कुठेही सावलीचा आश्रय मिळत नाही.

RELATED ARTICLES

Most Popular