प्रवाशांना केंद्रबिंदू मानणाऱ्या एसटी महामंडळाकडूच प्रवाशांची प्रचंड फरपट सुरू आहे. मध्यवर्ती बसस्थानकाचे सुरू असलेले काम आणि त्याचवेळी रहाटाघर बसस्थानकाची केली जाणारी दुरुस्ती यामुळे रखरखत्या उन्हामध्ये होरपळत प्रवाशांना एसटीची वाट पाहावी लागत आहे. महामंडळाने प्रवाशांची गैरसोय टाळून त्यांना तात्पुरता निवारा द्यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे; परंतु महामंडळ याबाबत ढिम्मच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांची आहे. रत्नागिरी शहरातील प्रवासीथांबा असलेल्या ठिकाणी हिरवे कापड बांधून निवाराशेड उभ्या कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी ही एसटीचे ब्रीदवाक्य असले तरी एसटी प्रशासनाकडून रहाटाघर येथे प्रवाशांची थट्टाच सुरू आहे. हिरवे कापड लावण्यात आले तिथे प्रवाशांना थांबण्यास जागाच नाही. ज्या ज्या वेळी रस्त्यावर लांब पल्ल्याच्या गाड्या लावण्यात येतात तेथे लोकांची गर्दी होते; पण कोणती गाडी आहे आणि कुठे उभे राहायचे हे कळत नाही. त्यामुळे धावाधाव करावी लागते. कडक उन्हात सावलीच्या शोधात रस्त्यावर, टपरीच्या बाजूला आडोशाला प्रवासी आसरा घेत आहेत. रहाटाघर बसस्थानक, मुख्य बसस्थानकासमोर, मारूती मंदिर स्टॉप, साळवीस्टॉप थांबा आणि सर्वात चिंतेची बाब म्हणजे रेल्वेस्थानक फाट्यावरील कुवारबांवचा थांबा या ठिकाणी एसटी बससाठी उभे राहणाऱ्या प्रवाशांची अवस्था बिकट असते.
या ठिकाणी प्रवाशांच्या निवाऱ्याची सुविधाच नाही. एसटी आणखी आर्थिक खाईत गेली तरी काही घेणे-देणे नाही, अशा आविर्भावात सर्व आहेत; कोरोना आणि संपाचा काळ एसटीने आठवून प्रवाशांना सेवा दिली पाहिजे अन्यथा प्रवाशांनी पाठ केली तर एसटीला चांगलेच महागात पडेल.
निवाराशेड अपेक्षित – कामानिमित्त लांजा, राजापूर, दापोली येथून येत असल्याने रत्नागिरीत आल्यावर रहाटाघर येथे उन्हात तिष्ठत एसटीची प्रतीक्षा करावी लागत आहे. रहाटाघर येथे समोर रस्त्यावर गाड्या लावण्यात येत असल्यामुळे पळापळ होते. प्रवास करताना नकोसा जीव होतो. केलेले निवाराशेड या वाऱ्यामुळे कमकुवत होत आहेत, तसेच तेथे उभे राहण्यासही जागा नाही.