अनेक वर्षापासून चालत आलेली लालबागच्या राजाच्या स्थापनेची परंपरा, मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजाची स्थापना करण्यात आली नव्हती. यंदा मात्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल, असे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जाहीर केले आहे.
लालबागच्या राजा गणपतीच्या दर्शनासाठी मुंबई आणि उपनगरातील नव्हे तर अनेक देशो विदेशातून सुद्धा भक्तगण येतात. त्यामुळे गेल्या वर्षी कोरोनाच्या संख्येत वाढ होण्याच्या भीतीने काहीशी प्रमाणात भीती निर्माण झाली होती. नाराज असलेल्या भक्तांसाठी यंदाच्या वर्षी मात्र गुड न्यूज आहे. या वर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशभक्तांच्या विनंतीचा विचार करून, साध्या पद्धतीने परंतु साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गणेशमूर्तीच्या उंची संदर्भात सरकारने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे यावेळी लालबागच्या राजाची मूर्ती केवळ चार फुटांचीच असेल, हे देखील स्पष्ट केले आहे.
राजाच्या उत्सवाच्या निमित्ताने उसळणारी गर्दी पाहता, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मंडळाने भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची देखील यावर्षी व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. १९३४ पासून लालबाग मंडळाच्यावतीने गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. मात्र इतक्या वर्षाची परंपरा गेल्या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे ८६ वर्षांत पहिल्यांदाच खंडित झाली होती, मागच्या वर्षी होणारी गर्दी कोरोना स्प्रेडर ठरू शकते, याचा अंदाज येऊन मंडळाने गणेशोत्सव साजरा केला नव्हता.
जगभरामध्ये नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी बाप्पाची ख्याती आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळामध्ये अनेक ठिकाणाहून भक्त दर्शनासाठी रीघ लावतात. दिवसरात्र दर्शन प्रक्रिया सुरूच असते. त्यामुळे प्रत्यक्ष येऊन गर्दी न करता, ऑनलाईन दर्शनाच्या सुविधेचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.