रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर येणारा आंबा घाट २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला असून, अन्य १० ठिकाणी दरडी कोसळल्याने, त्या हटवण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे. डोंगराकडील कळकदरा येथील काही रस्त्याचा भाग खचल्याने वाहनांची होणारी वाहतूक धोकादायक ठरू शकते, यासाठी गेले १० दिवस आंबा घाट पूर्णत: बंद ठेवण्यात आला आहे.
सध्या आंबा घाटातील दरडी बाजूला करण्याचे काम पूर्ण झालेले असून, रस्ता ज्या ठिकाणी खचला आहे त्या ठिकाणी नवीन रस्ता तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरड कोसळलेल्या ठिकाणी विविध मशीनरीचा वापर करून रस्ता बनवण्याचे काम सुरू असल्याने मोठ्या आणि अवघड वाहनांसाठी सध्या तरी पर्यायी मार्गाचाच वापर करणे योग्य ठरणार आहे.
अतिवृष्टीमुळे रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटमागील बरेच दिवस बंद आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे घाटमाथ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक व्यापार्यांना आंबा घाट बंद असल्याने, वाहतूक बंद असल्याने, अतोनात नुकसान झाले आहे. वाहतुकीसाठी नवीन रस्ता तयार करण्याचे काम केव्हा पूर्ण होईल, हे इतक्यात सांगता येणार नसल्याने, आंबा घाट वाहतूक पूर्ववत सुरू होण्यासाठी वाहनचालकांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कोल्हापूरचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी असे म्हटले आहे कि, आंबा घाटामध्ये प्रथमच दरडी कोसळल्याने, भविष्यात हा धोका पुन्हा संभवू नये यासाठी महामार्गाची परत पाहणी करून, महामार्गावर फक्त हलक्या वाहनाची वाहतूक सुरू करता येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येत्या दोन दिवसामध्ये भूगर्भ तज्ञांमार्फत तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.