चिपळूणवासियांचे अतिवृष्टी आणि महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बारा दिवस उलटूनही शासनाने पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली नसल्याने पूरग्रस्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. शासनाने पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यामध्ये पूरग्रस्त पान टपरी धारकासाठी १० हजार रुपये, व्यापाऱ्यांकरता ५० हजार रुपये, ज्यांचे घर संपूर्ण नुकसानग्रस्त झाले आहे, त्यांना दीड लाख रुपये अशा प्रकारच्या मदतीची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता, तीव्र नाराजी व्यक्त करत चिपळूण व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष अरुण भोजने यांनी सांगितले कि, सरकारने आमच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
शासनाच्या या तुटपुंज्या मदतीबाबत कार्याध्यक्ष किशोर रेडीज यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपयांचे जे पॅकेज जाहीर केले असून, त्यामध्ये सामान्य नागरिक असो वा छोटे – मोठे व्यापारी असोत, यांना जी मदतीची रक्कम जाहीर केली आहे, ती तुटपुंजी असून पुरेशी नाही. पुरामुळे दुकानेच पाण्याखाली गेल्याने व्यापाऱ्यांचे २५ लाख ते कोट्यवधी रुपयांमध्ये नुकसान झाले असून, शासनाने पूरग्रस्त व्यापाऱ्यांसाठी फक्त ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे. या ५० हजार रुपयांमध्ये व्यापारी पुन्हा कसा काय उभा राहू शकतो? असा खडा सवाल उपस्थित केला जात आहे.
आम्ही सर्व व्यापारी शासनाच्या या मदतीबाबत नाराज आहोत. शासनाने व्यवसायाप्रमाणे लक्षात घेऊन आमच्या अपेक्षेप्रमाणे छोटया व्यावसायिकांसाठी ५ लाख रुपये, मध्यम व्यवसायिकांसाठी १० लाख तर मोठ्या व्यावसायिकांसाठी १५ लाख रुपये मदत जाहीर करणे गरजेचे होते. मात्र राज्य सरकारकडून तसे घडले नाही. यावरून व्यापारी वर्ग पुन्हा कसा उभा राहणार? असा प्रश्न आत्ता आमच्या समोर येऊन ठेपला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.