चिपळूण शहर व परिसरात वर्षापूर्वी आलेल्या महापुरानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू झाले. या कालावधीत सुमारे १८ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. त्यानंतर वाशिष्ठी नदीची वाढलेले वहन क्षमता, खोली आदीचा अभ्यास करण्याचे काम सुरू झाले आहे. पुढील आणखी काही दिवस हे काम सुरू राहणार असून शहराची लाल व निळी पुररेषा निश्चित करण्यासाठी हा अभ्यास महत्वपूर्ण ठरणार आहे. २२ जुलै २०२१ रोजी आलेल्या महापुरात चिपळूण शहर व परिसराची मोठी वित्तहानी झाली होती. त्यानंतर वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळाचा मुद्दा ऐरणीवर आला होता.
नागरिकांनी बचाव समितीने आवाज उठवल्यानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ काढल्यास सुरवात झाली. पहिल्या वर्षात जलसंपदा विभागाची राज्यातील सर्व यंत्रणा तैनात केली होती. सुमारे ७.५० लाख घनमीटर गाळ काढला होता. त्यानंतर सलग दोन वर्षे गाळ काढण्याचे काम सुरूच राहिले आहे. या कामामुळे वाशिष्ठी नदीची एकूण वहन क्षमता किती वाढली, खोली किती प्रमाणात वाढली, पुराचे पाणी किती दाबाने वाहून जाऊ शकते, नदीत पाण्याचा आवाका किती आहे आदी सर्व बाबींचा अभ्यास केला जात आहे.
हे काम पुण्यातील एका खासगी संस्थेला देण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत हे काम सुरू झाले असून पावसाळ्यात देखील ते सुरू राहणार आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप नियमित पावसाला जोर नाही. एकाच दिवशी ११० मिलीमीटरपेक्षा अधिक शहर अथवा तालुक्यात पावसाची नोंद झालेली नाही. मुसळधार पाऊस झाल्यानंतर नदीतील पुराचे पाणी किती क्षमतेने वाहून जाते, नदीत किती पाणीसाठा होऊ शकते, याचाही अभ्यास केला जाणार आहे.