महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावर कुणकेश्वर आणि काळबादेवी येथील दोन पुलांच्या बांधकामासोबत आणखी दोन पुलांसाठी ठेकेदार नियुक्त केले आहेत. त्यामध्ये जयगड खाडीवरील तवसाळ ते जयगड खाडी पूल आणि कुंडलिका खाडीवर रेवदंडा ते साळव खाडी पुलाचा समावेश आहे. चार पुलांचे ठेकेदार नियुक्त झाल्यामुळे सागरी महामार्गाच्या कामाला गती येणार आहे. कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर कोकण किनारपट्टीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावर पूल उभारण्यासाठी एकूण चार पुलांच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या.
त्यातील १.६ किमी लांबीचा कुणकेश्वर पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिरासमोर बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये १६५ मीटर लांबीच्या मुख्य स्पॅनसह ३३० मीटर लांबीच्या “आयकॉनिक” पुलाचा समावेश आहे. २ लेनचा १.८ किमी लांबीचा काळबादेवी पूल रत्नागिरी जिल्ह्यातील काळबादेवी खाडीवर काळबादेवी बीच आणि सड्यामिऱ्याला जोडणार आहे. या पुलाच्या कामासाठी सर्वात कमी बोलीदार म्हणून “विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड” ही कंपनी पात्र ठरली आहे. काळबादेवीसाठी २९१.६४ कोटी तर कुणकेश्वरसाठी १५८.६९ कोटी खर्च अपेक्षित आहे.
या दोन पुलांबरोबर आणखी दोन, अशा एकूण चार पुलांसाठी चार कंपन्यांनी ९ निविदा भरल्या होत्या. त्यामध्ये जयगड खाडीवरील तवसाळ ते जयगड खाडी पूल ३.८ किमी मार्गासह व कुंडलिका खाडीवर रेवदंडा ते साळव खाडी पूल ४.४ किमी मार्गासह उभारण्यात येणार आहेत. या साठी विजय बिल्डकॉन कंपनीने लघुतम निविदा भरल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. आता निविदा अंतिम करून कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. पुलांच्या कामासाठी तीन वर्षाचा कालावधी निश्चित केला जाणार आहे.