27.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeChiplunएसटी बस आरवली उड्डाणपुलावरून सुसाट - चालक-वाहकांची मनमानी

एसटी बस आरवली उड्डाणपुलावरून सुसाट – चालक-वाहकांची मनमानी

आरवली या थांब्यावर २५ गावांतून प्रवासी येत असतात.

मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस बेदरकारपणे उड्डाणपुलावरून जात असल्याने प्रवाशांची परवड होत आहे. एसटी बसना मुंबई-गोवा महामार्गावर आरवली येथे अधिकृत थांबा आहे. अपवादात्मक चिपळूण- रत्नागिरी एक थांब्यासारखी गाडी वगळता प्रत्येक गाडी आरवली येथे थांबणे अनिवार्य आहे. मुंबई-पुणे व अन्य लांब पल्ल्याहून येणाऱ्या बसेसना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने आरक्षण देखील दिले जाते. ही वस्तुस्थिती असताना वाहक, चालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवासीवर्गाला शारीरिक व मानसिक त्रासाला समोरे जावे लागत आहे.

आरवली या थांब्यावर २५ गावांतून प्रवासी येत असतात. मोठ्या आशेने एसटी बसेसची ऊन-पावसात आरवली थांब्यावर वाट पाहणाऱ्या प्रवाशांना जेव्हा अनधिकृतपणे उड्डाणपुलावरून एसटी बस समोरून जाताना दिसते त्या वेळी प्रवाशांची कुचंबणा झालेली पाहायला मिळत आहे. प्रवाशांचा वेळही वाया जात आहे. यामध्ये नोकरदार व विद्यार्थ्यांना नेमून दिलेल्या वेळेला मुकावे लागत आहे शिवाय आरवली थांब्यावर बसण्याची सोय नसल्यामुळे गरोदर महिला, वृद्ध प्रवासी, शाळकरी मुले, आजारी व्यक्ती यांसह साऱ्यांनाच ऊन-पावसात ताटकळत उभे राहावे लागत आहे.

दुसरीकडे एसटी बसमधून प्रवास करून आरवली थांब्यावर उतरण्यासाठी पुढे येणाऱ्या प्रवाशांना चक्क गाडी उड्डाणपुलावरून जाईल, असे सांगितले जाते आणि चिपळूणहून रत्नागिरीकडे जाताना आरवलीत केदारनाथ मंदिराजवळ उतरवले जात आहे. संगमेश्वरकडून चिपळूणकडे जाताना स्टेटबँकेच्या इथे उतरवले जात आहे. यामध्ये मुंबई-पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांकडे मोठ्या प्रमाणात सामान असते. असे असताना अर्ध्यावर उतरवणे हे माणुसकीला धरून आहे का? असा सवाल संतप्त प्रवासी करत आहेत. लांबून आपले सामान घेऊन चालत येणे वृद्धांना जिकिरीचे होत आहे.

चिपळूणहून रत्नागिरीकडे जाताना प्रवाशांनी वाहकाला बस पुलाखालून जाईल ना, अशी विचारणा केल्यावर वाहकाकडून उद्धटपणे उत्तरे दिली जात आहेत. वाहक-चालक संगनमताने एकमेकांकडे सोयीस्कररीत्या बोट दाखवून प्रवाशांचे हाल करत असल्याचा आरोप प्रवासीवर्गातून होत आहे. राज्य शासन स्वतःच्या तिजोरीवर भार घेऊन ७५ वर्षांवरील प्रवाशांना फुकट, महिलांना ५० टक्के सवलत, मुलींना मोफत पास असे उपक्रम राबवत आहे. दुसरीकडे रिकाम्या बस फिरवण्यात धन्यता मानणारे प्रवाशांसोबत उद्धट वर्तन करणारे कर्मचारी, प्रवाशांना खासगी सेवेचा आधार घ्यायला प्रवृत्त करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular