वापरास अत्यंत धोकादायक बनलेल्या नवीन भाजीमार्केटच्या इमारतीवर गुरुवारी (ता. ११) हातोडा पडणार होता. पालिकेच्या मालमत्ता विभागाकडून पोलिस बंदोबस्तात ही कारवाई होणार होती; परंतु गाळेधारकांनी त्याला विरोध केला. हे प्रकरण न्यायालयात आहे. उद्या (ता. १२) त्याची अंतिम सुनावणी आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर मंगळवारी (ता. १६) पोलिस बंदोबस्तात ही इमारत पाडण्यात येणार असल्याचे पालिका मालमत्ता विभागाने सांगितले. इमारतीतील अतिशय धोकादायक खोकी, काही भाग जेसीबीने पाडण्यात आला. या कारवाईवेळी या भागात गर्दी झाली होती. गाळेधारकांची धावपळ सुरू होती.
शहरातील नवीन भाजीमार्केटची ही इमारत वापरासाठी अत्यंत धोकादायक झाली आहे. ही इमारत कधीही कोसळू शकते. ही इमारत पाडण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम १९४ व १९५ अन्वये संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. इमारतीचा वापर करणाऱ्या गाळेधारकांना व नागरिकांना ताकीद देण्यात आली आहे. या इमारतीचा वापर करणे हे अ त्यंत धोकादायक असून, इमारत कोसळून जीवित किंवा वित्तहानी झाल्यास पालिका जबाबदार असणार नाही, अशी नोटीसही पालिकेने बजावली आहे. इमारतीच्या दोन्ही बाजूंना तसा बोर्डही लावला आहे.
पालिकेच्या नगररचना विभागामार्फत करण्यात आलेल्या पाहणीमध्ये आणि स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत अतिशय धोकादायक ठरली आहे. अनेक वर्षांपासून गाळेधाराकंना नोटिसा बजावण्यात येत आहेत; परंतु गाळेधारक न्यायालयात जाऊन पालिकेच्या या कारवाईला स्थगिती आणतात. येथे एकूण ३२ गाळे आहेत; परंतु त्यातील अनेक गाळे पडून आहेत. काही मोजकेच गाळे वापरात आहेत. इमारत धोकादायक असल्याने ती कधीही पडण्याची शक्यता होती. आज पालिकेने ही इमारत पाडण्याचा निर्णय घेतला.
पोलिस बंदोबस्त घेऊन तसेच जेसीबी, कर्मचारी घेऊन धोकादायक बनलेला भाग जेसीबीने पाडण्यात आला. भाजीमार्केटच्या दरवाजाला कुलूप लावण्यात आले; परंतु अजूनही त्या इतर व्यावसायिक इमारत, गाळ्यांचा वापर करत आहेत. पालिकेची कारवाई सुरू असताना गाळेधारकांनी याला विरोध केला. आम्ही न्यायालयात गेलो आहे. न्यायालयाचा उद्या निर्णय होईल. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात यावी, अशी विनंती केली. त्यामुळे तुर्तास ही कारवाई थांबविण्यात आली आहे.