श्रीलंका दौऱ्यासाठी बहुचर्चित संघनिवड अखेर जाहीर करण्यात आली. हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादव द्वेन्टी-२० मालिकेसाठी कर्णधार असणार आहे; तर एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पुनरागमन केले आहे. जसप्रीत बुमराला मात्र पूर्ण दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यातील पहिला सामना २७ जुलै रोजी होणार आहे. विश्वकरंडक विजेत्या संघात हार्दिक पंड्या उपकर्णधार होता. रोहित शमनि या प्रकारातून निवृत्ती स्वीकारल्यामुळे हार्दिककडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात येईल, असे चित्र होते; परंतु अजित आगरकर यांच्या निवड समितीने नवे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सूर्यकुमार यादवची कर्णधारपदी नियुक्ती केली.
रोहित, विराट संघात परतले – टी-२० विश्वकरंडक जिंकल्यानंतर परदेशात सुटीसाठी गेलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली. फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी सिनियर खेळाडू खेळतील, असे जय शहा यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. त्यामुळे रोहित-विराट यांची निवड अपेक्षित होती. शिवाय नवे प्रशिक्षक गंभीर यांनीही या दोघांसाठी आग्रह धरला, असे सांगण्यात येत आहे.
रवींद्र जडेजाला स्थान नाही – द्वेन्टी-२० प्रकारात रोहित आणि विराटसह निवृत्ती स्वीकारणारा रवींद्र जडेजा एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध होता; परंतु त्याचा विचार करण्यात आलेला नाही. अक्षर पटेलवर विश्वास कायम ठेवण्यात आला आहे.