राज्यातील १९३ एसटी बसस्थानकांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून ६०० कोटींचा निधी दिला आहे. त्यापैकी माझ्या पाली गावातील ३ कोटी ३४ लाख रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या पहिल्या बसस्थानकाचे उद्घाटन माझ्या हस्ते व्हावे, असा संकल्प होता. तो आज पूर्ण झाला. बसस्थानकातील पहिला वातानुकूलित हिरकणी कक्ष या बसस्थानकात झाला. पाली गाव आदर्श मॉडेल ठरेल, असा विकास करण्याचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी स्वच्छता आणि सकारात्मकता ठेवावी, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. पाली येथील नव्या बांधलेल्या एसटी महामंडळाच्या बसस्थानकाचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष घाडगे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, प्रांताधिकारी जीवन देसाई, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, बाबू म्हाप, विनया गावडे, गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव, कांचन नागवेकर, आदी उपस्थित होते. उदय सामंत म्हणाले, जिल्ह्यातील रत्नागिरी, जाकादेवी, पावस, लांजा, गणपतीपुळे, आदी बसस्थानकांच्या विकासासाठी एमआयडीसीकडून ८० कोटी मंजूर केले आहेत. अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम केले आहे.
गडचिरोलीसारख्या नक्षलवादी जिल्ह्यामधील बसस्थानकांच्या सुशोभीकरणासाठी १० कोटी देण्यात आले आहेत. पालीमधील सुसज्ज एसटी बसस्थानकांमधील उपहारगृहात कमी दरात चांगले पदार्थ द्यायची सोय परिवहन महामंडळाने केली पाहिजे. बसस्थानके स्वच्छतागृहे, स्वच्छ सुंदर ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. पाली हे गाव विकासातील आदर्श मॉडेल करण्याचा प्रयत्न आहे. महिला बचतगटांसाठी पहिला वातानुकूलित हॉल पाली गावात बांधण्यात येणार आहे. यामुळे बचतगटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ निर्माण होणार आहे. विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी प्रास्ताविक केले.