गेले दोन दिवस राजापूर शहरात घुसलेले पुराचे पाणी सोमवारी (ता. २२) सकाळी ओसरले; मात्र पावसाचा जोर कायम असून अर्जुना नदीही इशारा पातळीवर असल्याने पुराची टांगती तलवार कायम आहे. गेले दोन दिवस आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या राजापूर शहरातील व्यापाऱ्यांचा सोमवारचा दिवसही चिखल काढण्यात व साफसफाईत गेल्याने दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली. शनिवारपासून पडणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारी पावसाने आणखी जोर केला. अर्जुना व कोदवली नद्यांचे पुराचे पाणी शहरात घुसले होते. पुराच्या पाण्यात रोहित्र पाण्यात गेल्याने गेले दोन दिवस शहरातील अनेक भागातील वीजपुरवठाही खंडित झाला होता.
सोमवारी पहाटे पावसाचा जोर कमी झाल्याने अर्जुना नदीने गाठलेली धोका पातळी कमी झाली असली तरी अद्यापही अर्जुना नदी इशारा पातळीवर आहे. सकाळी जवाहर चौकासह बाजारपेठेत शिरलेले पुराचे पाणी ओसरले. त्यानंतर दिवसभर व्यापारी व नागरिक चिखल काढण्यात व साफसफाई करण्यात व्यस्त होते. त्यामुळे व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवावी लागली. जवाहर चौकात असलेले पुराचे पाणी ओसरल्यानंतर दुपारपासून एसटी वाहतूक सुरू करण्यात आली. पूर ओसरल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने व हवामानखात्यानेही अतिवृष्टीचा इशारा दिल्याने राजापूर शहरावरील पुराच्या पाण्याचे संकट कायम आहे.