शासनाच्या घरकुल योजनेतून घर मंजूर झालेल्या अनेक लाभार्थ्यांनी उसनवारी करत घराचे बांधकाम केले आहे. या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी मिळणाऱ्या अनुदानाची प्रतीक्षा आहे. तालुक्यामध्ये मोदी आवास घरकुल योजनेचे ८४० घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ८३७ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे अनुदान प्राप्त झाले आहे. ४५९ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता तर ३४५ लाभार्थ्यांना तिसऱ्या हप्त्याची रक्कम प्राप्त झालेली नाही. तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना सुमारे तीन कोटी रुपये अनुदानाची प्रतीक्षा आहे. घरकुल योजनेतून लाभार्थ्याला घर बांधकामासाठी साहित्य आणि मजुरी असे मिळून सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी प्रशासकीय मंजुरीनंतर घराचे बांधकाम केले आहे. त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य खरेदी आणि मजुरीसाठी लागणाऱ्या रकमेसाठी उसनवारही केली आहे. अनेकांचे घराचे बांधकाम पूर्ण होऊन सुमारे चार-पाच महिन्यांचा कालावधी लोटला तरी अनुदान मिळालेले नाही. अनुदानाअभावी काही घराचे बांधकाम अर्धवट राहिले आहे. घरकुल योजनेच्या अनुदानाची रक्कम शासनाकडून तत्काळ उपलब्ध व्हावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.