वीस दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या चाकरमानी मागील वर्षी पेक्षा जास्त तयारीने कोकणात गावी येण्यासाठी उत्सुक आहेत. कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण अजून तेवढे नियंत्रित न आल्यामुळे शासनाने चाकरमान्यांसाठी गावामध्ये प्रवेश करण्यापूर्वी सरसकट लसीकरण आणि तपासणी मोहीम हाती घेण्याचे योजिले आहे.
मागील वर्षी कोरोनामुळे गावी गणेशोत्सव साजरा करता न आल्याने, यंदाच्या वर्षी दोन महिन्यांपूर्वी गावाकडे येण्याची तयारी चाकरमान्यांनी करून ठेवली आहे. येणारा गणेशोत्सवात ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशा कोकणामध्ये प्रवेश करणाऱ्या चाकरमान्यांना विना हरकत दाखल होण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती आमदार योगेश कदम हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कोकणातील आमदारांच्या शिष्टमंडळासह करणार असल्याची माहिती खेड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिली.
मागील वर्षी कोरोनाचा प्रभाव जास्त असल्यामुळे, गावागावांमधून बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांना विरोध केला जात होता. आहात तिथेच राहून गणेशोत्सव साजरा करा असेही आवाहन करण्यात आले होते. परंतु, सध्या यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रभाव आणि बधितांची संख्या कमी झाल्याने, गावी जाऊन गणेशोत्सव साजरा करण्याचे चाकरमान्यांचे स्वप्न साकार होणार आहे. त्याचप्रमाणे आता कोरोनावर लस उपलब्ध झाल्यामुळे गावकऱ्यांचाही विरोध मावळला आहे.
त्यामुळे आमदार योगेश कदम यांनी यंदाच्या वर्षी येणाऱ्या चाकरमान्यांना, ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहेच आहे त्यांना कोकणामध्ये विनासायास प्रवेश करण्यासाठी कोणतेही निर्बंध लागू करू नयेत अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे सांगितले आहे.