१ अधिक ३० च्या कमिट्या झाल्या तर कोणाची गरज भासणार नाही. भारतीय जनता पक्ष स्वतःच्या हिंमतीवर लांजा राजापूर साखरपा विधानसभेची जागा जिंकू शकतो असा ठाम विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी लांजा येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना व्यक्त केला. लांजा तालुका भाजपाची विस्तार कार्यकारीणीची बैठक (अधिवेशन) बुधवारी १४ ऑगस्ट रोजी शहरातील कुलकर्णी काळे छात्रालय या ठिकाणी पार पडले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष राजेश सावंत बोलत होते.
या बैठकीप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह लांजा – राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव, विधानसभा प्रवास योजना प्रमुख अभिजीत गुरव, लांजा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, जिल्हा सरचिटणीस अमित केतकर, निमंत्रितं सदस्य विजय कुरूप, लांजा तालुका प्रभारी भाई जठार, बुथ संघटन संयोजक डॉ. निमकर, महिला जिल्हाध्यक्ष सुयोगा साळवी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजय गुरव, महिला तालुकाध्यक्ष परिणीती सावंत, तालुका सरचिटणीस विराज हरमले यांच्यासह तालुका सरचिटणीस शैलेश खामकर, नगरसेवक तसा संयोजक संजय यादव, नगरसेवक मंगेश लांजेकर, श्रीम. शितल सावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर टोळे, महिला शहराध्यक्ष संपदा कुरूप, प्रकाश मांडवकर, जिल्हा कमिटी सदस्य वाघोजी खानविलकर, अनिल पन्हळेकर, परेश नामे, प्रथमेश बेंडल आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले की, आपापसातील वाद वाद बाजूला ठेवा. वादापेक्षा संवाद साधा. काय चुकत असेल तर चर्चा करा. आपला पक्ष आपले कुटुंब ‘आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका या भाजपाच्या माध्यमातून लढवून जिंकायच्या आहेत. किंबहुना लांजा पंचायत समितीचा सभापती देखील भाजपाचाच निवडून आणायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागा. खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून आपल्याला या भागाचा विकास करायचा आहे. तर कोकणचे नेते नारायण राणे खासदार झाल्यापासून अधिकाऱ्यांची देखील मानसिकता बदलली आहे. त्यामुळे भाजपा पदाधिकारी म्हणून लोकांची कामे करण्यास त्या ठिकाणी गेल्यास तुम्हाला नक्कीच मानसन्मान मिळेल असा विश्वास राजेश सावंत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.