कोलकाता येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संप सुरू केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत. या गुन्ह्यातील पीडितांच्या समर्थनार्थ आणि चालू असलेल्या हिंसाचारविरोधात राष्ट्रीय इंडियन मेडिकल असोसिएशनने उद्या (ता.१७) सकाळी ६ ते १८ ला सकाळी ६ पर्यंत २४ तासांच्या सेवाबंदीचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने आयएमए रत्नागिरीतर्फे अत्यावश्यक सेवा वगळता इतर वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता आणि प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास ते अयशस्वी ठरले. १३ ऑगस्टला, कोलकता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेला (CBI) हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. १५ ऑगस्टला मेडिकल कॉलेजची मोठ्या जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या वेळी जमावाने गुन्हा झालेली जागेचीही तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हा घटनाक्रम डॉक्टर, विशेषतः महिलांच्या हिंसेच्या वाढत्या धोक्याचा आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुरक्षेच्या आवश्यकतेचा संकेत देतो.
अत्यवस्थ असलेल्या रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून अत्यावश्यक व आपत्कालीन सेवा सुरू राहतील; पण नियमित बाह्यरुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात येतील. अत्यावश्यक सेवेसाठी रुग्ण आपल्याजवळील डॉक्टरांकडे किंवा परकार हॉस्पिटल, चिंतामणी हॉस्पिटल, चिरायू हॉस्पिटल किंवा रामनाथ हॉस्पिटल येथे संपर्क करू शकतात. सेवा बंद करण्याचा हेतू रुग्णाची गैरसोय व्हावी हे नसून व्यवस्थेचे या घटनेकडे लक्ष वेधणे व योग्य ते कारवाई व्हावी, असे आहे. त्यामुळे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो व त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो, असे आयएमए रत्नागिरीचे अध्यक्ष डॉ. अतुल ढगे यांनी सांगितले.