रत्नागिरी शहराची रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे झालेली खिळखिळीत स्थिती पाहता नागरिकांना विनाकारण शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासासाठी नक्की कोणाला जबाबदार धरायचे? सगळे रत्नागिरीतील रस्त्यांवरील खड्डयांची जबाबदारी नगराध्यक्ष आणि रस्ते खोदकामाबाबत शासनाचे नियम आहेत, त्याप्रमाणे काम करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी यांची आहे.
रत्नागिरी शहरातील रस्त्यांची झालेली बिकट अवस्था पाहता, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने रस्ते या विषयामध्ये स्पष्ट सूचना दिल्या असून, रस्त्याचे काम सुरू करताना कामा संदर्भातील एक फलक लावलेला असणे गरजेचे आहे, त्यावर कंत्राटदाराचे नाव ,फोन ,कामाचे स्वरूप, कामाचा कालावधी अशी माहिती प्रदर्शित करणे आवश्यक असते. कंत्राटदारातर्फे असलेल्या अटी आणि तपशील देखील जाहीर करायच्या असतात. यापैकी रत्नागिरीच्या रस्त्यांसंदर्भात काय काय घडले आहे? याबाबत तत्काळ खुलासा नगरपालिकेने करावा अन्यथा संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी रत्नागिरी बी.एन. पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
दिवसेंदिवस रस्त्यांची झालेली वाताहत पाहता, अनेक शारीरिक आजारांना निमंत्रण मिळत आहे. हजारो रुपये अशा आजारांवर खर्च करावे लागत आहेत. मानसिक त्रास तो वेगळाच. रत्नागिरी खड्ड्यात गेली आहे कि काय? अशी दोलायमान अवस्था सध्या रत्नागिरीतील रस्त्यांची झालेली आहे. खड्ड्यात रस्ते शोधायचे कि, रस्त्यावर खड्डे! इतके खड्डे निर्माण झाले आहेत कि, रस्ता त्यात्य्न कुठे आहे ते शोधावा लागत असून मग त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनचालकांची कसरत होत आहे.