गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित आणि आनंददायी होण्यासाठी कोकण रेल्वेने यंदा मध्यरेल्वे, पश्चिम रेल्वे आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने ३१० विशेष ट्रेन फेऱ्या चालवल्या आहेत. बहुसंख्य चाकरमानी आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जादा फेऱ्यांमुळे आज वेळापत्रकावर परिणाम झाला होता. एक ते दोन गाड्या उशिराने धावत होत्या. शनिवारी गणेशोत्सवास असल्यामुळे चाकरमानी कोकण रेल्वेने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध स्थानकांवर दाखल झालेले आहेत. नियमित गाड्यांसह जादा फेऱ्या सोडलेल्या आहेत. एक लाखाहून अधिक चाकरमानी आज रेल्वेने आलेले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जादा गाड्यांमुळे नियमित फेऱ्यांचे वेळापत्रक बिघडले असून, अनेक गाड्या एक ते दीड तास उशिराने धावत होत्या.
दहा तासांचा प्रवास बारा ते तेरा तासांवर जात होत्या. पॅसेंजर गाड्याच नव्हे तर एक्स्प्रेस गाड्यांनाही प्रचंड गर्दी होती. अनेकांनी उभ्याने प्रवास केलेला होता. कोकण रेल्वेमार्गावर गेले दोन दिवस जादा फेऱ्या धावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये उधना, विश्वामित्री, सुरत, अहमदाबाद, मुंबई सेंट्रल, मुंबई सीएसएमटी, लोकमान्य टिळक (टी), वांद्रे, पनवेल ते रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडगाव, सुरतकल, ठोकूर आणि मंगळुरू या मार्गावर चालवण्यात आल्या आहेत. राज्य आरोग्य प्राधिकरणांच्या समन्वयाने माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी स्थानकावर प्रथमोपचार चौक्या उभारण्यासह प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयी सुनिश्चित करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
आपत्कालीन परिस्थितीसाठी सरकारी रुग्णालये आणि पॅनेलमधील रुग्णालयांमधील रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी, युटीएस तिकिटांच्या बुकिंगची सुविधा सध्याच्या ७ पीआरएस स्थानांवर म्हणजे माणगाव, खेड, चिपळूण, स रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर गणपती उत्सव कालावधीत उपलब्ध आहेत. माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर अतिरिक्त युटीएस तिकीट बुकिंग विंडो उघडली जाईल. ठराविक अंतराने स्थानकांवर नियमित घोषणा उपलब्ध केल्या जातील. प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवर ‘यात्री साहाय्यक’ तैनात केले आहेत.