शहरातील संसारे उद्यानामध्ये ध्यानकेंद्र उभारण्यात येणार असून, त्यासाठी २० कोटी रुपये खर्च येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांची ही संकल्पना आहे. हे महाराष्ट्रातील पहिले केंद्र असून त्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. यामध्ये प्रशस्त इमारत उभारली जाणार आहे. त्यामध्ये १२० नागरिकांना एकाचवेळी ध्यान करता येणार आहे. त्या इमारतीवर ४० फूट उंचीची भगवान गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती बसवण्यात येणार आहे. रत्नागिरी पालिकेने ध्यानकेंद्र उभारण्याचे काम स्वामी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे.
या कामासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात पाच कोटी, तर दुसऱ्या टप्प्यात १५ कोटी रुपये मिळाले आहेत. या ध्यानकेंद्रामुळे रत्नागिरी शहरात आध्यात्मिक केंद्र सुरू होणार आहे. पर्यटनवाढीसाठी पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरी शहरात ही नवी संकल्पना आणली आहे. शहरातील संसारे उद्यानात या ध्यानकेंद्राचे काम सुरू आहे. पूर्वी या ठिकाणी असलेल्या उद्यानाची देखभाल दुरूस्ती होत नव्हती. त्यामुळे उद्यानाची वाताहत झाली होती. त्या जागेत हे ध्यानकेंद्र उभारले जात आहे. येथील इमारतीत नागरिकांना ध्यान सभागृह, आध्यात्मिक बूक स्टॉल, सुशोभित उद्यान आणि वाहनतळाची व्यवस्था असेल.
गेल्या काही दिवसांमध्ये रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पालकमंत्री सामंत यांनी विशेष पावले उचलली होती. त्यामध्ये मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ उभारलेली शिवसृष्टी, जिजामाता उद्यानात संभाजींचा भव्य पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि स्वा. सावरकर पुतळ्यावजळ म्युरल्स उभारण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळाली आहे. त्याचबरोबर शहर सुशोभीकरणाची विविध कामे सुरू असल्यामुळे रत्नागिरी
सुंदर शहर ही संकल्पना प्रत्यक्षात उरेल, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.