लखनौ येथे १ ते ५ ऑक्टोबर यादरम्यान शेष भारत संघाविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या इराणी क्रिकेट करंडकासाठी मुंबई संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. अजिंक्य रहाणे याच्याकडे मुंबई संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले असून अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरचे संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे तो जून महिन्यापासून क्रिकेटपासून दूर होता. पृथ्वी शॉ याला संघात स्थान देण्यात आले असून गेल्या काही महिन्यांमध्ये धडाकेबाज फलंदाजी करणारा मुशीर खानही संघामध्ये कायम आहे. सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे यांचाही मुंबईच्या संघात समावेश आहे. शम्स मुलानी, तनुष कोटियन व मोहित अवस्थीमुळे मुंबई संघाला बळकटी मिळाली आहे.
अय्यरसाठी महत्त्वाचा सामना – भारताच्या कसोटी संघात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असलेल्या श्रेयस अय्यरसाठी इराणी करंडकाचा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. श्रेयस अय्यरला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने चमक दाखवल्यास आगामी काळात टीम इंडियाच्या कसोटी संघासाठी त्याच्या नावाचा विचार होऊ शकेल.
मुंबईचा संघ – अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), सिद्धांत अदाटराव, शम्स मुलानी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनेद खान, रॉयस्टन डायास.
सर्फराझ, दुबेचा समावेश भारतीय संघावर अवलंबून – सर्फराझ खान व शिवम दुबे या दोन मुंबईकर खेळाडूंचा समावेश भारतीय संघावर अवलंबून आहे. सर्फराझ खान याची बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात निवड करण्यात आली आहे, तसेच शिवम दुबे हा भारताच्या टी-२० संघाचा सदस्य आहे. भारत-बांगलादेश यांच्यामध्ये ६ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. बीसीसीआयकडून या दोन्ही खेळाडूंना इराणी करंडकात खेळण्याची मुभा देण्यात आली किंवा भारताच्या अंतिम संघात त्यांना स्थान मिळाले नाही तरच हे दोनही खेळाडू मुंबईसाठी खेळू शकणार आहेत, तसेच सूर्यकुमार यादवकडे भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व असल्यामुळे त्याचीही इराणी करंडकासाठी निवड करण्यात आलेली नाही.