भारतीय जेम्स आणि ज्वेलरी विश्वातला पहिल्या क्रमांकाचा उद्योग आहे. त्याचे प्रशिक्षण केंद्र रत्नागिरीत सुरू होत आहे. ही रोजगाराची नवी मोठी संधी आहे. ३५ हजारांपासून अडीच लाख रुपयांपर्यंत पगाराची नोकरी या क्षेत्रात मिळू शकते. प्रशिक्षणानंतर पन्नास जणांची बॅच मुंबईत नोकरीसाठी जाईल तेव्हा माझ्या आमदारकीचे व मंत्रिपदाचे सार्थक होईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. येथील विठ्ठल मंदिराजवळील संतोष खेडेकर ज्वेलर्सच्या पहिल्या मजल्यावर सुरू करण्यात आलेल्या भारतीय जेम्स आणि ज्वेलरी संस्थेच्या रत्नागिरी कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
स्वयंवर कार्यालय येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमाला जेम्स अॅन्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे संचालक विपुल शाह, उपसंचालक किरीट भन्साळी, कार्यकारी संचालक सब्यासाची रे, रत्नागिरी जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खेडेकर, चिपळूण सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विजयभाऊ ओसवाल, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ हिमंतसिंगका, देवाषिश विश्वास, उपव्यवस्थापक जितेंद्र घोलप, जिल्हा उद्योगकेंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणभर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले, रत्नागिरीत सुरू होणारा हा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. नवी मुंबईमधील जेम्स अॅन्ड ज्वेलरी पार्कमध्ये राज्याची आर्थिक व्यवस्था चालवण्याची ताकद आहे. त्यांचे अत्याधुनिक कंट्रोल रूम पाहिल्यानंतर आधुनिकता काय असते हे समजून येते. विश्वातला पहिल्या क्रमांकाचा हा उद्योग आहे. याचे प्रशिक्षण केंद्र रत्नागिरीत सुरू होत आहे. ही रोजगाराची नवी संधी आहे. याप्रसंगी भन्साळी यांनी प्रशिक्षण, उद्योग आणि मिळणारी नोकरी याबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सब्यासाची रे आणि आभार खेडेकर यांनी मानले.