माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. २ नेत्यांमध्ये तब्बल अर्धातास चर्चा झाली. या भेटीत मालवण-कुडाळ विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली असून नारायण राणेंचे ज्येष्ठ चिरंजीव आणि माजी खा. निलेश राणे हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. या पार्श्वभूमिवर खा. राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. विधानसभा निवडणुकीच्या हालचाली वेगात सुरु आहेत.
मालवण-कुडाळ विधानसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. ठाकरे गटाचे वैभव नाईक हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येईल असे सांगितले जाते. या विधानसभा मतदारसंघावर राणे कुटुंबियांनी दावा केला आहे. या पार्श्वभूमिवर खा. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून हा मतदारसंघ भाजपला सोडावा अशी मागणी करण्यात आली आहे.
तथापी मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात राहिला तर निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करून या मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरु झाली आहे. राणेंच्या भेटीमध्ये याबाबत चर्चा झाल्याचे बोलले जाते. खा. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट आणि निलेश राणे यांची उमेदवारी याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. अधिकृतपणे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
मी विधानसभेत असणार… – ४ दिवसांपूर्वी माजी खा. निलेश राणे रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले असताना आपण यावेळी विधानसभेत असणार असे सुतोवाच् त्यांनी निवळी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. निवडणूक लढवणार पण मतदारसंघ कोणता हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले होते. मतदारसंघाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमिवर खा. राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर चर्चा सुरु झाल्या आहेत.