महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तारखांबाबत साऱ्यांना उत्सुक्ता लागून राहिली आहे. ऑक्टोबर महिना सुरु झाला असून नोव्हेंबरमध्ये मतदान होईल असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर १३ ऑक्टोबरनंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. म्हणजेच १३ ऑक्टोबरनंतर आचारसंहिता जाहीर होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हरियाणा व जम्मू काश्मीर निवडणुकांचे निकाल ८ ऑक्टोबरला लागणार आहेत. परंतू म्हणजेच हरियाणा जम्मू काश्मीर निवडणूक कार्यक्रम १० ऑक्टोबरला संपणार आहे. निकाल जरी ८ ऑक्टोबरला लागला तरी निवडून आलेल्या सदस्यांची सुची राज्यपालांना सादर केली जाईल. त्यानंतर राज्यपाल गॅझेट प्रसिद्ध करतील.
त्यामुळे हरियाणा आणि जम्मू-काश्मिर निवडणुकांचा कार्यक्रम १० ऑक्टोबरला संपेल. नियमानुसार एक निवडणूक कार्यक्रम संपण्यापूर्वी दुसऱ्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करता येत नाही. १० ऑक्टोबरला या दोन्ही मोठ्या राज्यांच्या निवडणुका संपल्यावर निवडणुक आयोगाला पुढच्या कार्यक्रमासाठी वेळ द्यावा लागतो. १३ ऑक्टोबरला रविवार आहे. त्यामुळे साधारणता १४ तारखेनंतर महाराष्ट्रात आचारसंहितेची घोषणा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबरच्या मध्यावर किंवा चौथ्या आठवड्यापूर्वी आचारसंहिता लागण्याची शक्यता वाढली आहे.
निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारण ४५ दिवसांनी नवीन विधानसभेची स्थापना होणे अपेक्षित असते. त्यामुळे निवडणूक आयोगाने नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक घ्यायचे ठरवले, तर त्यासाठी साधारण ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तेव्हापासून राज्यात लगेच आदर्श आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर ४५ दिवसांचा कालावधी गृहित धरला तरी २६ नोव्हेंबरपूर्वी नव्या विधानसभेची स्थापना होणे शक्य आहे. डिसेंबरमध्ये विधानसभेत नवीन सदस्य दिसतील, अशी शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.