एसटी महामंडळाकडून दर वर्षी दिवाळीत १० टक्के भाडेवाढ केली जाते. मात्र, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर टोल माफ करून मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या सरकारने ग्रामीण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचे वाहतूकीचे साधन असलेल्या एसटीची भाडेवाढही रद्द केल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. प्रतिवर्षाप्रमाण यावेळीदेखील २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान एका महिन्यासाठी महामंडळाने एसटीची १० टक्के भाडेवाढ लागू केली होती.
दिवाळीत केली जाणारी हंगामी भाडेवाढ रद्द केल्यामुळे एसटी महामंडळाला मिळणारी अतिरिक्त रक्कम यंदा मिळणार नाही. या भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार होता. परंतु, आता एसटीच्या तिकीटाचे दर ‘जैसे थे’ अवस्थेत राहतील.
शिवनेरी सुंदरी – मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेप्रमाणेच आदरादिथ्य आणि व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेम ण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या ३०४ व्या बैठकीत ही घोषणा केली.
बचत गटांचा स्टॉल – एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या ‘परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विकण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन स्टॉल उपलब्ध करून दिला जाणार आहे. उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन २५०० साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच १०० डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसम ध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.
टोलमाफी देत मुंबईकरांना दिवाळी भेट – मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. सोमवारी (१४ ऑक्टोबर) रात्री १२ वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी लागू झाली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.