परशुराम घाटात गेले आठ-दहा दिवस सातत्याने पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका मुंबई- गोवा महामार्गाला बसला आहे. मातीचा भराव आणि संरक्षक भिंत कोसळलेल्या ठिकाणी अजूनही धोका टळलेला नाही. संरक्षण भिंत कोसळलेल्या ठिकाणी भरावाची माती हळूहळू घसरत आहे. त्यामुळे परशुराम घाटातील धोका अजूनही टळलेला नाही. परशुराम घाटात एकीकडे दरड कोसळण्याच्या तर दुसरीकडे रस्ता खचण्याची भीती असल्याने येथे ठेकेदार कंपनीसह राष्ट्रीय महामार्ग विभागाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या घाटातील ४० मीटर लांबीची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. १६ ऑक्टोबरला ही घटना घडली असून, त्या वेळेपासून घाटातील एकेरी मार्ग बंद ठेवला आहे. परशुराम घाटातील दरडीच्या बाजूकडील महामार्गाच्या सुरक्षेच्यादृष्टीने ‘टीएचडीसीएल’ संस्थेचा सल्ला घेतला जात आहे. तूर्तास संरक्षक भिंत कोसळलेल्या ठिकाणी पुन्हा नव्याने आरसीसी संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक एकेरीच सुरू आहे. संरक्षक भिंत व काँक्रिटीकरणासाठी मजबुतीकरणाचे काम नव्याने करावे लागणार आहे. हे काम कल्याण टोलवेज कंपनीच्या कार्यक्षेत्रात येते. चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर १५ वर्षे रस्त्याची देखभाल दुरुस्ती या कंपनीकडे असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मातीचा भराव आणि संरक्षण भिंत या कंपनीकडून बांधून घेतले जाणार आहे. हे काम कंपनीने केले नाही तर महामार्ग विभाग स्वतः निविदा प्रक्रिया राबवून हे काम पूर्ण करून घेईल आणि त्यासाठी लागणारा खर्च कल्याण टोलवेजकडून वसूल करून घेईल. सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी धोकादायक स्थिती आहे त्यामुळे तातडीने येथे काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया न राबविता एका कंपनीकडून हे काम करून घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रयत्न आहेत.