शासनाने पीक पेरणीच्या नोंदी ठेवण्यासाठी सध्याच्या व्हर्चुअल युगामध्ये ई-पीक पाहणी अॅप विकसित केले आहे. यापूर्वी शेतीतील लागवड केलेले पिक आणि इतर नोंदी करण्यासाठी मंडल अधिकाऱ्यांसमवेत तलाठी जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत होते. परंतु, आत्ता काळाबरोबर चालताना शेतकरी सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहे.
राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हि अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला आहे. या अॅपद्वारे, पीक पेरणी नोंद, इतर नोंदी कशाप्रकारे करण्यात यावी यासाठी, तहसीलदार, प्रांताधिकारी, कृषी संबंधित अधिकारी, मंडल अधिकारी यांनी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यामध्ये शेतकर्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ई-पीक पाहणी अॅपचा वापर करुन आपली शेती आणि त्यांच्या नोंदी डीजीटल स्वरूपामध्ये नोंदणी करून सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रांत माने आणि जिल्हाधिकारी जाधव यांनी केले आहे.
पूर्वापार चालत आलेली तलाठ्यांमार्फतची शेतकर्यांनी पेरणी केलेल्या पिकांची नोंदणी पद्धत मागे पडत आहे, यावर्षीपासून मात्र शेतकरी स्वत: शेतातील पीक पेरणीची माहिती ई-पीक पाहणी अॅपद्वारे मोबाइल फोनवरून स्वतः भरणार आहे. त्यासाठी विकसित करण्यात आलेले अॅप आपल्या मोबाइलवर डाउनलोड करून घ्यायचे आहे. या उपक्रमामध्ये पीक पेरणी अहवालात शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग वाढणार आहे. पिकाची माहिती शेतकऱ्यांनी स्वतः भरावयाची असल्याने, वैयक्तिक माहिती भरून खातेदार म्हणून नोंदणी केल्यानंतर गट आणि खाते नंबर, पिकाची माहिती, हंगामनिहाय माहिती, पिकांचे छायाचित्र काढून ते अपलोड करावे लागणार आहे. आणि या शेतकऱ्यांनीच पाठविलेल्या अहवालानुसार पिकांच्या नोंदी सातबारा उताऱ्यावर केल्या जाणार आहेत.