शहरात झुंडीने फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांची नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे. त्याबरोवरच मोकाट जनावरांची समस्या गंभीर झाली आहे. मुख्य रस्त्यावरील तीव्र उतार, वळणाच्या ठिकाणांसह वाहनांची वर्दळ असलेल्या जवाहर चौकात अनेकवेळा मोकाट जनावरे ठाण मांडून असतात. त्यामुळे अनेकवेळा अपघात झालेले आहेत. याकडे नगरपालिका प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. राजापुरात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. झुंडीने फिरणारे कुत्रे अचानक अंगावर धावून येतात, तर काहीवेळा वाहनांचा पाठलागही करतात. या घटनांमुळे भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. त्याच्यासोबत मोकाट जनावरांचीही भर पडली आहे. शहरातील जकातनाका ते जवाहरचौक हा आधीच तीव्र उतार आणि वळणांमुळे धोकादायक रस्ता आहे. या रस्त्यावर सतत वाहतूककोंडी होत असते तसेच उतारावर मोकाट जनावरे बसलेली असतात. त्यामुळे अनेकवेळा अपघातही होतात. भटकी कुत्री आणि मोकाट जनावरांच्या समस्येतून राजापूरवासीयांची सुटका कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दोन वर्षात मालकांवर दंडात्मक कारवाई – गेली दोन वर्षे मोकाट गुरांच्या मालकांवर कारवाई केली जात आहे. त्यामध्ये गेल्या वर्षी मालकांना १४ हजारांचा दंड केला होता. यावर्षी आत्तापर्यंत मालकांना ३ हजारांचा दंड केला आहे, तसेच दोन वर्षे शहरात कुत्र्यांची नसबंदी केली होती. यावर्षी अद्याप त्याबाबत कार्यवाही केली नसली तरी निविदा प्रक्रिया राबवली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
मालकांवर कारवाई हवी – शहरात फिरणारी मोकाट जनावरे अनेकवेळा प्लास्टिक पिशव्या खातात. त्यामुळे काही मोकाट जनावरांचा मृत्यूही होतो. या घटनांवर वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी जनावरांच्या मालकांवर पालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. काही महिन्यांपूर्वी अशी मोहीम हाती घेतली होती. त्या धर्तीवर पुन्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली पाहिजे.
येथे असतात मोकाट जनावरे… – जवाहरचौक परिसर नगर वाचनालय, जिल्हा परिषद बांधकाम रस्ता ,राजापूर हायस्कूल येथील तीव्र उतार आणि वळणावर, तहसील कार्यालयासमोरील रस्ता, जकातनाका रस्ता, मुन्शी नाका परिसर , मुंबई-गोवा महामार्गावर एसटी डेपोजवळील उड्डाणपूल, साईनगर आणि आठवडा बाजार परिसर