रत्नागिरीतील राजीवडा येथील एका मासेमारी बोटीला देवगडच्या समुद्रात आग लागल्याचे वृत्त हाती आले आहे. बोटीवरील खलाशांमध्ये झालेल्या वादावादीचे रुपांतर प्रचंड राड्यात झाले आणि त्यातून एका खलाशाने आपल्या सहकाऱ्याचा ‘गेम’ केल्याची चर्चा सुरु आहे. त्यानंतर त्याने बोटीला आग लावली. त्यामुळे बोटीवर असलेल्या अन्य २७ खलाशांनी पाण्यात उड्या घेत आपला जीव वाचवला अशीही चर्चा मच्छीमारांमध्ये सुरु आहे. खोल समुद्रात १५ वाव अंतरात सोमवारी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, खून झाल्याच्या चर्चेला अजूनही मत्स्यविभाग किंवा संबंधित यंत्रणेने दुजोरा दिलेला नाही. सुरु असलेल्या चर्चेच्या आधारे तपास सुरु आहे असे मत्स्य विभागांच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीसांनीही पत्रकारांना अधिक माहिती देताना सांगितले. मात्र बोटीला आग लागली, ही, माहिती खरी असल्याचे सांगून ही बोट रत्नागिरीतील राजिवडा परिसरातील असल्याचे प्रशासनाने सांगितले.
आगीचे लोळ – राजिवडा येथील मासेमारी नौका देवगड समुद्रात गेली होती. रविवारी दुपारी १२.३० वाजता मिरकरवाडा बंदरातून ही बोट मासेमारीसाठी निघाली. खेलाशांनी मासेमारीकरीता जाळे समुद्रात सोडले होते. काही वेळाने या बोटीवरुन आगीचे लोळ उठलेले पहायला मिळाले. मासेमारी बोटीला भरसमुद्रात आग लागल्याने आजूबाजूला मासेमारीसाठी आलेल्या नौकांनी मदतीसाठी धावं घेतली.
मुंडके कापल्याची चर्चा? – दरम्यान या घटनेबाबत मच्छिमार आणि संबंधितांमध्ये वेगळीच चर्चा सुरु आहे. बोटीवरील तांडेल आणि एका खलाशाचा वाद झाला. या वादातून बोटीवर तांडेल म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा खलाशाने खून केला, तांडेलाचे मुंडकेच उडवल्याची चर्चा सुरु आहे. मात्र मुंडके उडवले की खून केला याबाबत अद्याप पोलिसांनीदेखील कोणतीही माहिती दिलेली नाही. पोलीसांचे एक पथक त्या नौकेवर गेले आहेत असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
बोटीलाच आग लावली – मात्र मच्छिमारांमध्ये सुरु असलेल्या चर्चेनुसार सेहकाऱ्याचा खून करून या खलाशाने कोणाला काही कळायच्या आत बोटीलाच आग लावली. बघता बघता समुद्रात नांगरलेल्या बोटीने भडका घेतला. आगीचे लोळच्या लोळ उसळले होते. नेमकं घडलंय काय हे कोणालाच कळत नव्हते.
२७ खलाशी – रत्नागिरीतील राजीवडा परिसरातील ही मासेमारी बोट होती अशी चर्चा सुरु आहे. या बोटीवर २७ खलाशी होते, अशी माहिती पुढे आली आहे. बोटीला आग लागल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी या खलाशांनी पटापट – समुद्रात उड्या घेतल्या आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
‘पोलिसांची नौका धावली – हा प्रकार देवगड-कुणकेश्वर दरम्यान घडल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी पोलिसांच गस्ती नौका त्याच परिसरात होती. एका खलाशाला पाण्यात उडी म ारताना पोलिसांनी पाहिले होते. त्यानुसार पोलिसांनी त्या खलाशाच्या दिशेने बोट व पळवली. त्या खलाशाला ताब्यात घेतले. त्यावेळी बोटीला आग लावण्यात आल्याची माहिती मिळाली असून एका खलाशानेच ती लावल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने पोलीसांना दिली असल्याचे चर्चीले जाते. मात्र त्याबाबत अधिकृत दुजोरा पोलीसांनी दिलेला नाही.
इतर नौका धावल्या – या बोटीवरील सर्वच्या सर्व खलाशांनी पाण्यात उड्या घेतल्या होत्या. वेगवेगळ्या दिशेला हे खलाशी पोहोत जात होते. हा प्रकार इतर मासेम ारी नौकांवरील खलाशांनी पाहिला आणि मदतीसाठी धाव घेतली. वेंगवेगळ्या नौकांमधून समुद्रात उड्या घेतलेल्या खलाशांना घेऊन त्या नौका देवगड बंदरात रात्री उशिरापर्यंत आणण्याचे प्रयत्न सुरू होते.
मुंडकं बोटीवर ठेवलं? – या दुर्घटनेनंतर देवगड परिसरात वेगवेगळ्या चर्चा सुरू असून सोशल मीडियावरदेखील वेगवेगळे तर्क लढवणारी वृत्त व्हायरल झाली आहेत. त्यानुसार तांडेलाचं मुंडकं कापून या खलाशाने बोटीवर ठेवलं आणि त्यानंतर बोटीला आग लावली, अशी चर्चा आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आली आहे.
दीड कोटींचे नुकसान – बोटीला आग लागली ही वस्तुस्थिती आहे. परंतु तांडेलाचा खून आणि खलाशानेच बोटीला आग लावली याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती पोलीस किंवा मत्स्य विभागाकडून मिळालेली नाही. मात्र चर्चा जोरात सुरु आहे. सोशल मिडियावर तर पोस्टचा पाऊस पडला आहे. आता उलट सुलट चर्चा सुरू आहेत. पोलिसांनी देखील या घटनेला अद्याप दुजोरा दिलेला नाही. मात्र सुरु असलेल्या चर्चेच्या आधारे देखील तपास सुरु आहे असे पोलीसांनी पत्रकारांना याबाबत माहिती देताना. सांगितले. त्यामुळे नेमकं घडलं काय? असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला आहे. दरम्यान याबाबत देवगड पोलीस स्थानकात मच्छिमारांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. राजिवड्यातील बोटीला लागलेल्या आगीची माहिती रत्नागिरीत येताच रत्नागिरीतील अनेक मच्छिमारांनी देवगडकडे धाव घेतली. राजिवडा परिसरातूनदेखील मच्छिमार देवगडकडे रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.