27.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

सिलेंडरच्या स्फोटात संगमेश्वरातील कुटुंबावर मोठा घाला

कोल्हापूर येथे ही दुर्घटना घडली आहे. गणेशोत्सवासाठी...

धावत्या रेल्वेतून उतरणे तरूणाच्या आले अंगाशी…

अति घाई आणि संकटात नेई, असे म्हणतात....

कडवई पाझर तलावाचे काम १८ वर्षे लोटली तरी अर्धवट

कडवई घोसाळकर कोंड येथील पाझर तलावाचे काम...
HomeMaharashtraयंदा नोव्हेंबरमध्ये थंडी कमीच, किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता

यंदा नोव्हेंबरमध्ये थंडी कमीच, किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता

कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला.

नोव्हेंबर महिन्यातील पाऊस आणि कमाल, किमान तापमानाचा अंदाज वर्तविण्यासाठी शुक्रवारी (ता. १) आयोजित पत्रकार परिषदेत हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली. नोव्हेंबर महिन्यात वायव्य भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा वर राहण्याची शक्यता अधिक आहे. महाराष्ट्रात किमान तापमान अधिक राहणार असल्याने नोव्हेंबरमध्ये थंडी कमी राहण्याचे संकेत आहेत. तर वायव्य आणि पश्चिम मध्य भारतात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये देशात सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे. या काळात प्रामुख्याने दक्षिण भारतातील राज्यात सर्वाधिक पाऊस पडतो. १९७१ ते २०२० या काळातील दीर्घकालीन सरासरीनुसार दक्षिण भारतात नोव्हेंबरमध्ये ११८.७ मिलिमीटर, तर संपूर्ण देशात सरासरी २९.७ मिलिमीटर पाऊस पडतो. नोव्हेंबरमध्ये दक्षिण भारतात १२३ टक्क्यांपेक्षा अधिक, तर देशात ७७ ते १२३ टक्के पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ऑक्टोबरमध्ये उच्चांक – यंदाच्या ऑक्टोबरमध्ये किमान तापमानाचा पारा आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर राहिल्याचे दिसून आले. ऑक्टोबरमध्ये सरासरी २१.८५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. १९०१ पासूनच्या नोंदी विचारात घेता यंदा ऑक्टोबरचे सर्वांधिक किमान तापमान ठरले आहे. यापूर्वी १९५१ मध्ये सरासरी २१.२८ अंश किमान तापमानाची नोंद झाली होती.

मॉन्सून परतीच्या काळात महाराष्ट्रात अधिक पावसाची नोंद – यंदा मॉन्सून परतीच्या काळात महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. १ ते ३१ ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल ८६.२ मिलिमीटर, म्हणजेच सरासरीपेक्षा १६ टक्के अधिक पाऊस पडला. कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. तर मराठवाड्यात सरासरी इतका, तर विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. पावसाने हजेरी लावली असली, तरी राज्याच्या बहुतांश भागात यंदा ‘ऑक्टोबर हीट’चा चटका तापदायक ठरला.

RELATED ARTICLES

Most Popular