25.1 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeSindhudurgसावंतवाडीत बंडखोरीचा इतिहास काय सांगतो?

सावंतवाडीत बंडखोरीचा इतिहास काय सांगतो?

दीपक केसरकर आणि भोसले यांच्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी चुरस होती.

येथील विधानसभा मतदारसंघात बंडखोरीमुळे चुरस वाढली आहे. बंडखोरी आणि मतविभागणी यावर निवडणुकीचा निकाल ठरेल असा अंदाज व्यक्त होत आहे; मात्र विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीला येथे बंडखोरी किंवा मतविभागणी नवी नाही. या आधी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश दळवी यांच्यासह दिग्गजांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढल्याचा इतिहास आहे. सावंतवाडीतील लढत महाविकास आघाडी, महायुतीतील बंडखोरीमुळे चर्चेत आली. या चौरंगी लढतीत कोण कोणाची मते खाणार आणि मतविभागणी कोणाच्या पथ्यावर पडणार हे सांगणे कठीण बनले आहे. असे असले तरी या मतदारसंघाचा इतिहास पाहता अशी राजकीय कोंडी नवी नाही. याची सर्वाधीक उदाहरणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडे आहे. याची सुरुवात साधारण १९९५ च्या निवडणुकीपासून झाली, असे म्हणावे लागेल. त्या आधीच्या दशकात मतदारसंघातील काँग्रेसवर श्रीमंत शिवरामराजे यांचा प्रभाव होता.

१९९० मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर प्रवीण भोसले पहिल्यांदाच निवडून आले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या १९९५ च्या लढतीत येथून तब्बल १४ उमेदवार रिंगणात होते. यावेळी काँग्रेसी विचारधारा असलेल्या राजघराण्यातील राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांनी अपक्ष म्हणून लढत दिली होती; मात्र याचा भोसलेंच्या विजयावर परिणाम झाला नाही. १९९९ च्या निवडणुकीत मात्र मतविभागणीचा फटका काँग्रेसला बसत शिवसेनेचे शिवराम दळवी निवडून आले. राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसतर्फे विकास सावंत (१५९५९ मते) आणि राष्ट्रवादीतर्फे प्रवीण भोसले (३००२३ मते) यांनी लढत दिली. यावेळी शिवराम दळवी अवघ्या १२३१ मतांनी निवडून आले होते. २००४ च्या निवडणुकीतही बंडखोरी झाली. यावेळी राष्ट्रवादीने प्रवीण भोसलेंना (३४८६८ मते) उमेदवारी दिली.

या पक्षातील उमेदवारीचे तगडे दावेदार असलेले ज्येष्ठ नेते सुरेश दळवी (२६७८२ मते) यांनी अपक्ष लढत बंडखोरी केली. यावेळीही शिवसेनेचे दळवी ४२८४ मतांच्या फरकाने विजयी झाले. २००९ च्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री भोसलेंनी बंडखोरी केली. यावेळी दीपक केसरकर आणि भोसले यांच्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी चुरस होती. केसरकरांनी ६३४३० मते घेतली. भोसलेंना १९३६४ मते मिळाली. मात्र बंडखोरी होऊनही केसरकर शिवसेनेच्या शिवराम दळवी यांचा तब्बल १८४१८ इतक्या मोठ्या फरकाने पराभव करण्यात यशस्वी ठरले.

२०१९ च्या निवडणुकीतील स्थिती वेगळी – २०१९ च्या निवडणुकीत थोडी वेगळी परिस्थिती होती. यावेळी केसरकर शिवसेनेच्या तिकिटावर लढले. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांनी त्यांच्याशी फारकत घेत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली. यावेळी शिवसेना-भाजप युती असूनही भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी अपक्ष लढत दिली. त्यांना भाजपने उघडपणे रसद पुरवली. तरीही केसरकर विजयी झाले. एकूणच सावंतवाडी मतदारसंघाला बंडखोरीचा आणि मतविभागणीचा प्रकार नवा नाही; मात्र एकाचवेळी दोन तगडे अपक्ष रिंगणात उतरल्याची स्थिती पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular