स्वयंचलित हवामान केंद्राअभावी पिकविमा योजनेच्या लाभापासून तालुक्यातील भू परिसरातील सुमारे ३०० हून अधिक शेतकरी वंचित राहिलेले असताना शासनातर्फे हवामानातील बदलाच्या नोंदी टिपण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय चर्चेत आला आहे. जिल्ह्यामध्ये सुमारे ३०० ग्रामपंचायतींमध्ये अशा प्रकारची स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्यात येणार असून, त्यामध्ये तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यापैकी १९ ग्रामपंचायतींचे परिपूर्ण प्रस्ताव पंचायत समिती प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. गेल्या काही वर्षामध्ये हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. वादळी वारे, अवकाळी पाऊस, तापमान वाढीमुळे पिकांवर परिणाम होत असतो. महसूल मंडल स्तरावर बसवण्यात आलेली पर्जन्यमापक यंत्र वा स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून हवामानातील विविधांगी बदलांच्या नोंदी सद्यःस्थितीमध्ये होत आहेत; मात्र, या केंद्राची संख्या, काहीशी मर्यादित असल्याने त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
त्यानुसार आता ग्रामपंचायत स्तरावरही हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे.फळपीक विमा असो वा पीकविमा योजना असो नुकसान भरपाई देते वेळी विमा कंपन्या अनेकवेळा स्कायमेटकडून त्या त्या वेळच्या हवामान बदलाची माहिती घेतात; मात्र, आता राज्य सरकारच्या नव्या धोरणामुळे ग्रामपंचायत स्तरावर उभारण्यात येणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्रांमुळे सर्व माहिती ! एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह विमा कंपन्यांना नुकसानीची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदतीची रक्कम मिळण्यास मदत होणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायतींमध्ये उभारण्यात येणारी स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीसाठी विविध निकषान्वये जागांची निवड करण्यात आली आहे.
प्रस्ताव प्राप्त झालेली गावे – अणसुरे, ओशिवळे, साखरीनाटे, उन्हाळे, ताम्हाणे, पांगरे बुद्रुक (शेंबवणे), आंबोळगड, देवीहसोळ, तळगाव, पाचल, पेंडखळे, जुवाठी, तुळसवडे, कोळवणखडी, करक, ओणी, कळसवली, कारवली, ओझर