बॉलीवूडमध्ये कधी, कुठे आणि कोणत्या गोष्टीची चर्चा होईल याचा नेम नाही. कधी कोण प्रसिद्धीच्या लाटेवर सवार होईल, तर कधी कोण त्याच लाटेवरून घसरून पडेल, अशी अवस्था सध्या बॉलीवूडमध्ये आहे. मिळालेल्या अहवालानुसार अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे याला वर्षाला दीड कोटी एवढा पगार असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जितेंद्र शिंदे बिग बींना सुरक्षा पुरवण्याचे काम करत आहेत. साधारण २०१५ सालापासून अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड म्हणून जितेंद्र शिंदे याची नियुक्ती आहे. पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आयुक्त पदभार स्वीकारल्यानंतर, चार वर्षांपेक्षा अधिक काळ कुणीही व्यक्ती एका पदावर किंवा एका पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत नसेल असे फर्मान काढलं होत. या नियमांतर्गत कॉन्स्टेबल शिंदे यांची बदली करण्यात आली असून, अमिताभ बच्चन यांच्या सिक्युरिटीमधून काढून, शिंदे यांची डी.बी.मार्ग पोलिस स्थानकामध्ये बदली करण्यात आली आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र शिंदे यांची स्वत:ची खाजगी सिक्युरीटी एजन्सी देखील आहे, अशीही माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे, कारण, पोलीस खात्यात कार्यरत असताना, इतरत्र कुठेही नोकरी असणे, हे पोलिस नियमांच्या विरुद्ध आहे. त्याचप्रमाणे, समजलेला हा प्रकार गंभीर असून खरंच शिंदे यांना इतकं वेतन दिलं जात का? याबाबत अमिताभ बच्चन यांच्याकडूनही माहिती घेतली जाणार आहे. एवढे वेतन एखाद्या कंपनीच्या सीईओला सुद्धा नसते असे म्हणणे मांडण्यात आले.