22.9 C
Ratnagiri
Wednesday, December 17, 2025

गुहागर किनारा ‘ब्लू फ्लॅग’च्या अंतिम टप्प्यात…

गुहागर आयोजित किनारी वाळूशिल्प प्रदर्शनावेळी विचारे आणि...

सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांची गैरसाय लांजा नगरपंचायतीला निवेदन

सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांच्या झालेल्या गैरसोयी संदर्भात भाजपचे...

एलईडी मासेमारी करणाऱ्या २ नौका गस्ती पथकाने पकडल्या

सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने एलईडी...
HomeDapoliदापोली बुरोंडी बंदराच्या जेटीचा प्रस्ताव धूळ खात - प्रशासनाची अनास्था

दापोली बुरोंडी बंदराच्या जेटीचा प्रस्ताव धूळ खात – प्रशासनाची अनास्था

मासळी मार्केटची इमारत नसल्याने तिथे विक्रेत्या महिलांची गैरसोय होत आहे.

तालुक्यातील स्वच्छ, स्वस्त आणि ताजी मासळी मिळण्याचे ठिकाण म्हणून बुरोंडी बंदराची ओळख आहे. १९७६ पासून सुमारे ४८ वर्षे या बंदरामध्ये जेटीची मागणी केली जात आहे; मात्र अद्यापही जेटी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. त्या प्रस्तावाची कागदपत्रे मत्स्य व्यवसाय कार्यालयात धूळखात आहेत. प्रशासनाच्या अनास्थेमुळे एक ना अनेक समस्यांच्या गर्तेत हे बंदर अडकून पडले आहे. हर्णै बंदराच्या जेटीच्या मंजुरीला देखील ४० वर्ष गेली आता तरी बुरोंडी बंदराच्या जेटीचा विचार व्हावा, अशी मागणी येथील स्थानिक मच्छीमारांकडून होत आहे. दापोली तालुक्यातील बुरोंडी बंदरात ताजी मासळी खरेदी केली जाते. या बंदरात मासेमारी करणाऱ्या साधारणपणे सुमारे १३९ लहान-मोठ्या नौका आहेत. या नौकांचे मालक खलाशी नाखवांसह दररोज मध्यरात्री २ ते पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास समुद्रात मासेमारी करण्यासाठी जातात आणि साधारणपणे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास समुद्रातून पकडलेली मासळी घेऊन किनाऱ्यावर येतात.

त्यामुळे बुरोंडीत दररोज खवय्यांना ताजी मासळी विकत मिळते. ताजी मासळी मिळत असल्याने तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांसह घरी खाण्यासाठी खवय्ये बुरोंडीत गर्दी करतात. या बंदरामध्ये ढोमा, मांदेली, कांटा, बिल्जा, बांगडा, बोंबिल, पापलेट, सुरमई, कोळंबीसारखे छोटे-छोटे इत्यादी दर्जेदार आणि चविष्ट मासे मिळतात. या बंदरात मोठे मासे मारले जात नाहीत. छोटे व ताजे मासे मिळण्याचे बंदर अशी ख्याती आजही या बंदराने जपली आहे. या बंदरात अजूनही मासेमारीसाठी महत्त्वाची मूलभूत समस्या असलेल्या साध्या जेटीची व्यवस्थादेखील या ठिकाणी नाही. त्यामुळे समुद्रातून मारून आणलेल्या मासळीच्या होड्या या किनाऱ्याला लावताना कमरेभर पाण्यातून मासळीच्या टोपल्या आणताना मासेमारांची चांगलीच दमछाक होते. बंदरात जेटीची जशी महत्त्वाची समस्या निकाली काढण्यात दुर्लक्ष झाले आहे. बुरोंडीत मासळी विक्रीकरिता मच्छीमार्केटची समस्या कित्येक वर्षे भेडसावत आहे.

मासळी विक्रीकरिता इमारत नसल्याने मासळी खरेदीसाठी बुरोंडीत दूरहून आलेल्यांना एकतर सकाळीच बंदरावर येऊन मासळी विकत घ्यावी लागते. ही जशी समस्या तीव्र आहे तसे मासळी विक्रेत्या महिलांना भर उन्हात उघड्यावर बसून मासळीची विक्री करावी लागते. यामध्ये उन्हाच्या कडाक्याने मासळी खराब होण्याचे प्रमाण अधिक असते. बुरोंडी बंदरातील अत्यावश्यक अशा प्रकारच्या विविध समस्यांची अजून किती काळ वाट पाहिल्यावर पूर्तता होईल? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष – मासळी मार्केटची इमारत नसल्याने तिथे विक्रेत्या महिलांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा या प्राथमिक गोष्टींकडे दुर्लक्ष झालेले आहे. आजही अनेक मूलभूत समस्या सोडवण्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळेच बुरोंडी बंदराचा विकास खुंटला असून, बुरोंडी बंदर आजही सगळ्यादृष्टीने असुरक्षित आहे.

RELATED ARTICLES

Most Popular