तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे किनाऱ्यावरील मंदिर परिसराला जोडून बांधलेल्या संरक्षण भिंतीचा काही भाग यंदाच्या पावसाळ्यात जोरदार लाटांच्या तडाख्याने कोसळला आहे. त्याची वेळीच दुरुस्ती झाली नाही तर पुढील पावसाळ्यात ती भिंत पूर्णतः कोसळून जाण्याची शक्यता आहे. मेरिटाईम बार्डाच्यावतीने गणपतीपुळे किनाऱ्यावर गेल्या काही वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून स्वच्छतागृह इमारत ते शासकीय विश्रामगृह इमारत ते मंदिर परिसरात संरक्षण भिंत बांधण्यात आली. या भिंतीला पायऱ्या बांधण्यात आल्यामुळे पर्यटकांना बसण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. सूर्यास्त पाहण्याचा आनंद या पायऱ्यावरून पर्यटक घेतात. विश्रामगृह ते मंदिर परिसराकडे जाणाऱ्या संरक्षण भिंतीचा काही भाग यंदाच्या पावसाळ्यात जोरदार लाटांमुळे कोसळला आहे. या संरक्षण भिंतीच्या पायऱ्या तुटल्या आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या पर्यटकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे.
मेरीटाईम बोर्डाने या भिंतीची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, मागील वर्षी गणपतीपुळे किनारी अचानक आलेल्या मोठ्या लाटेने अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. या संरक्षक भिंतीमुळे किनाऱ्यापासून थोडी बाहेरील बाजूला असलेल्या टपऱ्या, हातगाड्यांना लाटेचा तडाखा जाणवला नाही. लाट बंधाऱ्यावर आपटल्यामुळे तीव्रता कमी झाली आणि अनर्थ टळला.