एआय टेक्नॉलॉजीमुळे २०२५ मध्ये ८४ दशलक्ष नोकऱ्या जाणार आहेत; परंतु त्याच वेळी ९७ दशलक्ष नव्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत. ५४ टक्के व्यावसायिकांना रिस्कीलिंग करावे लागेल. १० लाख डाटा सायंटिस्टच्या नोकऱ्या वाढल्या आहेत. नवनवीन शिकलो तरच त्यात संधी मिळेल, असे प्रतिपादन एआय तज्ज्ञ डॉ. भूषण केळकर यांनी केले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या बारटक्के इन्स्टिट्यूट व गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. केळकर यांचे व्याख्यान गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात आयोजित केले होते. यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, बारटक्के इन्स्टिट्यूटच्या शालेय समिती अध्यक्ष डॉ. कल्पना मेहता, सल्लागार समितीचे अध्यक्ष सीए वरद पंडित, डॉ. मधुरा केळकर आदी प्रमुख उपस्थित होते.
डॉ. केळकर यांनी सांगितले, एआय म्हणजे त्सुनामी लाट आहे. त्या लाटेवर स्वार व्हायचे असेल, तर अनेक गोष्टी कराव्या लागतील. समजून घ्या व शिका आणि त्यासोबत राहा असेच मी म्हणतो. त्यांनी १०-८०-१० हे सूत्र बनवले आहे म्हणजे एआयचा वापर करताना योग्य प्रश्न विचारा, माहिती मिळेल व त्या माहितीचा योग्य उपयोग करा. विद्यार्थ्यांनी लिंकेन्ड या सोशल मीडियावर खाते काढावे ज्यामधून अनेकांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. शिल्पाताई म्हणाल्या, माझ्याकडे असलेल्या ज्ञानातून पुढे जायचं आहे. मला काय करायचं आहे, मी काय करू शकतो, हे कळण्यासाठी डॉ. केळकर यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे.
डॉ. मेहता यांनी प्रास्ताविकामध्ये बारटक्के इन्स्टिट्यूटची माहिती देऊन डॉ. केळकर यांच्या संस्थेसोबत काही अभ्यासक्रम राबवण्याबाबत विचार व्यक्त केले. डॉ. साखळकर यांनी महाविद्यालयाची माहिती दिली. बारटक्के इन्स्टिट्यूटच्या रसिका पालकर व अभिजित भाट्ये यांनी सूत्रसंचालन केले तसेच अमित पालकर यांनी आभार मानले.
हे करायला हवे ? – डॉ. केळकर यांनी विद्यार्थी किंवा तरुण, ज्येष्ठांनीही काय करायला पाहिजे याचे सविस्तर मार्गदर्शन केले. विश्लेषणापासून संश्लेषणाकडे जाणे आवश्यक आहे. सातत्याने शिकणे, लर्न अन् लर्न रिलर्न, किमान दोन विषयांत ज्ञान मिळवा, डाटा अॅनालिसिस करायला शिका, डिजिटल प्रेझेन्स हवा, सॉफ्ट स्किल्स शिका, डिझाईन थिंकिंग, पायथन प्रोग्रामिंग, परकीय भाषा शिका, अनुभवावर आधारित शिक्षण घ्या. सामान्य ज्ञानासाठी वृत्तपत्रे वाचा. ज्या समाजात राहतो त्या समाजाला काही देणं लागतो, ही भावना ठेवून शिका. नियमित व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा कराच तर एआयच्या जगात टिकावं लागेल, अशा महत्त्वाच्या टिपण्या त्यांनी दिल्या.