राजापूर बाजारपेठेमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. वारंवार सूचना करूनही व्यापाऱ्यांकडून अतिक्रमण हटवण्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे या अतिक्रमणाविरोधात पालिका प्रशासन आता ‘अॅक्शन मोड’ मध्ये आली आहे. बाजारपेठेमध्ये फेरफटका मारत येत्या आठ दिवसांमध्ये स्वतःहून अतिक्रमण हटवा अन्यथा थेट साहित्य जप्त करण्याचा इशारा पालिका प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना देण्यात आला आहे. बाजारपेठेतील रस्त्याच्या दुतर्फा आणि नदीकाठावरून गेलेल्या शिवाजीपथ रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण व्यापाऱ्यांनी स्वतःहून न हटवल्यास पुढील आठवड्यामध्ये थेट कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे व्यापारी स्वतःहून अतिक्रमण काढणार की, पालिका कारवाईचा बडगा उगारणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
अरूंद असलेल्या जागेमध्ये राजापूर बाजारपेठ वसली आहे. त्यामध्ये मुख्य रस्त्याच्या दुतर्फा विविधांगी दुकाने व्यापाऱ्यांनी थाटलेली आहेत; मात्र व्यापाऱ्यांनी ठिकठिकाणी केलेल्या अतिक्रमणांनी या रस्त्याने वाहने चालवताना अनेकवेळा जिकिरीचे बनते. काहीवेळा तर या रस्त्यावरच दुकानांसमोर दुचाकी उभ्या केलेल्या असतात. त्याच्यातून पादचाऱ्यांनाही जाणे मुश्किल बनते. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी पावसाळ्यामध्ये सुरक्षिततेच्यादृष्टीने उभारलेल्या झड्यांमुळेही त्रास सहन करावा लागत आहे. अतिक्रमणांकडे लक्ष वेधून सातत्याने पालिका प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना स्वतःहून अतिक्रमण हटवण्याच्या सूचना केल्या जात आहेत; मात्र, त्या सूचनांना व्यापाऱ्यांकडून दुर्लक्ष करत वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. त्यामुळे आता पालिका प्रशासन बाजारपेठेतील अतिक्रमणाच्या विरोधात अॅक्शनमोडवर आली आहे.
भाजीमंडई, मच्छीमार्केट ओस – भाजीविक्रेत्यांसह मच्छीविक्रेत्यांना सुयोग्य जागा उपलब्ध व्हावी आणि लोकांनाही त्या ठिकाणी खरेदी करणे अगदी सुलभ व्हावे या दृष्टिकोनातून नगर पालिकेने लाखो रुपये खर्च करून मच्छीमार्केट आणि भाजीमंडई उभारली आहे. मात्र, या भाजीमंडई आणि मच्छीमार्केटमध्ये बसण्याऐवजी अनेक भाजीविक्रेते बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर भाजी विकण्यासाठी बसलेले असतात. शिवाजीपथ रस्ता तर जणू काही मच्छीविक्रेत्यांचाच रस्ता बनलेला दिसतो.