27.1 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024

पारंपरिक लाल चेंडूवर भारतीयांचा सराव – रोहित शर्मा

(पीटीआय) गुलाबी चेंडूवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या...

Vivo X 200 स्मार्टफोन सीरीज उद्या लॉन्च होणार आहे…

टेक कंपनी Vivo उद्या (12 डिसेंबर) X...
HomeSindhudurgआंबोली-मांगेली टप्प्यात आठ वाघ - वनविभागाची नोंद

आंबोली-मांगेली टप्प्यात आठ वाघ – वनविभागाची नोंद

सिंधुदुर्गात इतक्या मोठ्या प्रमाणात वाघ असल्याचे अधिकृतरीत्या मान्य केले.

जिल्ह्यातील सावंतवाडी ते दोडामार्ग या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल आठ पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे. त्यात पाच मादी, तर तीन नर वाघांचा समावेश आहे. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची अधिकृतरीत्या वनविभागाच्या दप्तरी नोंद झाली आहे. वनशक्ती या संस्थेने आंबोली ते मांगेली हा व्याघ्र कॉरिडॉर संरक्षित व्हावा, म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल करत लढा दिला होता. या वाघांची नोंद याच कॉरिडॉरमध्ये झाली आहे. वनविभाग, सह्याद्री रिझव्र्ह फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टच्या माध्यमातून जानेवारी ते मे दरम्यान सह्याद्री टायगर रिझर्व्ह आणि कर्नाटकातील काली टायगर रिझर्व्ह या दोन्ही ठिकाणी हा सर्वेक्षण करण्यात आला होते. यामध्ये सिंधुदुर्गमध्ये तब्बल आठ वाघांचे अस्तित्व वेगवेगळ्या कॅमेऱ्यांमध्ये दिसून आले. सर्व वाघ सावंतवाडी तालुक्यातील आंबोली पट्ट्यात, तर दोडामार्ग तालुक्यातील काही भागांत आढळून आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासह खास करून आंबोली ते मांगेली पट्ट्यात वाघांचे अस्तित्व याआधीही वेळोवेळी अधोरेखित झाले होते.

खासगी संस्थांनी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये या वाघांचे अस्तित्व पुढे आले होते; परंतु वनविभागाने अस्तित्व वेळोवेळी नाकारले होते. दोन वर्षांपूर्वी आंबोली भागात एका गाईला खातानाचे छायाचित्र समोर आले होते. यावेळी वनविभागाने वाघाचे अस्तित्व मान्य केले होते. त्यानंतर बऱ्याचदा आंबोली चौकुळ भागात वाघ दिसून आला होता. काही महिन्यांपूर्वी दोडामार्ग तालुक्यातील भेकुर्ली येथे दिवसाढवळ्या वाघ आढळला होता. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर वनशक्ती फाउंडेशनच्या स्टॅलिन दयानंद यांनी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत सिंधुदुर्गात तब्बल पन्नास वाघांचा वावर असल्याचे सांगितले होते. एका संस्थेने केलेल्या सव्र्व्हेक्षणाचा अहवाल देत त्यांनी याला पुष्टी दिली होती. याच पार्श्वभूमीवर आता वनविभागाने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल आठ पट्टेरी वाघ अधोरेखित झाल्याने स्टॅलिन दयानंद यांनी केलेल्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच वनविभागाने सिंधुदुर्गात इतक्या मोठ्या प्रमाणात वाघ असल्याचे अधिकृतरीत्या मान्य केले.

वनशक्तीच्या लढ्याचे दृश्य फलित – दोडामार्ग तालुका पर्यावरण संवेदनशील असूनही पश्चिम घाट अभ्यासासाठी नियुक्त माधव गाडगीळ समितीच्या शिफारशी नाकारून कस्तुरीरंगन समितीने इकोसेन्सिटिव्हमधून वगळला होता. या भागात मांगेली ते आंबोली हा वाघाचा कॉरिडॉर असल्याने तो संरक्षित करावा, यासाठी वनशक्ती संस्थेचे स्टॅलिन दयानंद यांनी २०१३ पासून उच्च न्यायालयात लढा दिला. अखेर या याचिकेवर निर्णय देत सह्याद्रीच्या रांगांमधील २५ गावे ‘इको सेन्सिटिव्ह भाग’ म्हणून घोषित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. आता आढळलेले वाघ प्रामुख्याने याच भागात आहेत. हा त्या लढ्याचा विजय मानावा लागेल.

RELATED ARTICLES

Most Popular