सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार धास्तावले आहेत. मागील आठवड्यात सलग चार दिवस ढगाळ वातावरण राहिल्यामुळे हापूस कलमांवर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध फवारणी करावी लागत आहे. बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळाचे सावट हळूहळू दूर होत असल्यामुळे पुढील ३ दिवसांत थंडीला पुन्हा सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळाचा दक्षिणेकडील राज्यांना पावसाचा तडाखा बसला. चक्राकार वारे आणि कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकत अरबी समुद्राकडे आले. त्यामुळे महाराष्ट्रातही मागील आठवड्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली होती. हिवाळ्याची चाहूल लागताच पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वत्र ढगाळ वातावरणासह तापमानही वाढले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यात ८.८ अंश सेल्सिअसवरून पारा चार दिवसांत २१ अंशावर गेला.
अचानक झालेल्या बदलाचा परिणाम आंबा, काजूवर झाला आहे. राजापुरात हलका पाऊस झाला आहे; मात्र कालपासून वातावरण निवळू लागले आहे. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव ओसरू लागला आहे; परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे रत्नागिरी बागायतदार धास्तावले आहेत. मागील आठवड्यातील बदलत्या वातावरणामुळे मोहोरासह पालवीवर किडींचा प्रादुर्भाव होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पंधरा दिवसांत सलग दोन ते तीनवेळा औषध फवारणी करावी लागली आहे. राज्यात पुन्हा वातावरण बदलू लागले असून, गुलाबी थंडीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढणार आहे. कोकण कृषी विद्यापीठामधील हवामान विभागाकडूनही पुढीत ३ दिवसांत थंडी सुरू होईल, असा अंदाज वर्तवला आहे तसेच पावसाचे वातावरण निवळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. फेंगल चक्रीवादळाच्या पार्भूमीवर सुमारे आठ दिवसांनी पुन्हा वातावरणात बदल होत असल्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांना दिलासा मिळू शकतो.