गेली दोन वर्षे मि-या ग्रा. पं. कार्यक्षेत्रात महाराष्ट्र विजवितरण कंपनी व लिना पॉवरटेक कंपनी यांच्या मार्फत भूमीअंतर्गत वीज वितरण वाहिनी टाकण्याचे काम सुरू असून हे काम करताना मि-या नळपाणीपुरवठा पाईपलाईन वारंवार फुटल्याने पाणीपुरवठा करताना मोठया प्रमाणात अडचणी आल्या. गावात वाद निर्माण झाले, तसेच विद्युत केबल टाकताना योग्य ती खबरदारी घेतली नसल्याने सहा जनावरे शॉक लागून दगावली; सुरक्षेच्या उपाययोजना योग्य प्रकारे केल्या नाहीत त्यामुळे भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता, स्ट्रीट लाईटचे दर्जाहिन आणि बेजबाबदार काम अशा समस्या वारंवार निदर्शनास आणूनही कामामध्ये सुधारणा केली गेली नाही यामुळे गावकरी संतापले असून त्यांनी जिल्हाधिकारी कचेरीसमोर साखळी उपोषण केले. तसेच राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना पावसाचे पाणी जाण्यासाठी उपाययोजना न केल्याने पावसाचे पाणी लोकांच्या घरात घुसले. रात्रभर लोकांना पाण्यात रहावे लागले. तसेच रस्त्याचे कामसुध्दा निकृष्ट दर्जाचे झाले आहे याबाबत सुध्दा वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याला केराची टोपली दाखविण्यात आली.
मिऱ्या गावाच्या तिन्ही बाजुंनी समुद्र व खाडी असल्याने गावात शाश्वत गोडया पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत नाही. सध्या एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. सकाळी ५ ते ८ किंवा ९ या वेळेत ४ ते ५ तास पाणी सोडले जाते यावेळेत जर पाईपलाईन नादुरूस्त असेल तर पुन्हा त्या दिवसात पाणी मिळत नाही. रस्त्याचे काम, भूमीअंतर्गत केबल, जलजीवन मिशन पाईपलाईन इ. कामे करताना संबंधीतांनी योगय ती पूर्वतयारी न केल्याने वारंवार पाईपलाईन फुटुन पाणीपुरवठा खंडीत झाला व ग्रा. पं. ला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या साऱ्या विरोधात हे आंदोलन असल्याचे ग्रामस्थांनी ‘पत्रकारांना माहिती देताना सांगितले. जलजीवन मिशन अंतर्गत गावातील पाईपलाईन करणे हे काम सुध्दा तांत्रिक मापदंडानुसार होत नसल्याचे वारंवार निदर्शनास आणूनही त्यामध्ये सुधारणा झाली नाही व सदर कामे अद्यापही अपूर्ण आहेत. ओमेन मरीन कंपनीला सर्व प्रकारचे सहकार्य ग्रा. पं. ने सुरूवातीला केले, तेव्हा गावातील कामगारांना मक्तेदारांना प्राधान्य देण्याचे धोरण ठरवून ही त्यांनी बाहेरील कामगार भरती करणे अशा गोष्टी केल्या.
वरील बाबींसाठी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना निवेदने देवून जिल्हाधिकारी यांनी संबंधीत विभागांना पत्रव्यवहार केला तरीसुध्दा संबंधीत विभागांनी हे गांभीर्याने घेतले नाही व कामांमध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे या सर्व प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी नाईलाजाने आज हे पाऊल उचलले असल्याचे सरपंचांनी माहिती देताना पत्रकारांना सांगितले. किमान यापुढे तरी प्रशासन व्यवस्थित काम करेल अशी अपेक्षा आहे असे त्या म्हणाल्या. सोमवारपासून मिऱ्याच्या सरपंच आकांशा कीर, उपसरपंच उषा कांबळे, सदस्य आदिती भाटकर, स्मिता शिरधनकर, मानसी शिरधनकर, आर्या सावंत, रामदास बनप, आदेश भाटकर, गुरुप्रसाद माने, विजेंद्र कीर यांच्यासह ग्रामस्थ, माजी सरपंच बावा नार्वेकर, संदीप शिरधनकर, भैय्या भाटकर यांनी साखळी उपोषण सुरु केले आहे.