28.4 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024
HomeRatnagiriपन्नास हजार लिटर सांडपाण्यावर रोज प्रक्रिया - देवरूख ग्रामीण रुग्णालय

पन्नास हजार लिटर सांडपाण्यावर रोज प्रक्रिया – देवरूख ग्रामीण रुग्णालय

सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी शौचालयात फ्लशसाठी वापरले जात आहे.

देवरूख ग्रामीण रुग्णालयामध्ये सीवेज ट्रीटमेंट प्लांट बसवण्यात आला असून, यामधून प्रक्रिया केलेले सांडपाणी शौचालयात फ्लशसाठी वापरले जात आहे. सध्या रुग्णालयातील रोजच्या ५० हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. भविष्यात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग झाडांसाठी केला जाणार आहे. देवरूख ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे तीन महिन्यांपूर्वी उद्घाटन करण्यात आले आहे. या रुग्णालयाची ३० बेडची क्षमता आहे. रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. सध्या दिवसाला दोनशे रुग्णांची तपासणी केली जात आहे. राज्यातील रुग्णालयांसाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अनिवार्य करण्यात आला आहे. देवरूख रुग्णालयाचा २०२० मध्ये आराखडा तयार करण्यात आला. त्या वेळी सीवेज ट्रीटमेंट प्लांटचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे प्लांटचे काम पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयाच्या इमारतीचे उ‌द्घाटन करून नवीन इमारतीमध्ये कामकाजाला सुरुवात करण्यात आली.

ज्या रुग्णालयामध्ये १० खाटांपेक्षा अधिक खाटांची संख्या आहे अशा ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रणाली असणे अनिवार्य केले आहे. देवरूख रुग्णालयामधील रुग्णालय आणि वैद्यकीय अधिकारी निवासी इमारतीमधून पाणी बाहेर पडते, यावर प्रक्रिया केली जात आहे. यासाठी ३० लाख रु. चा निधी खर्च करण्यात आला आहे. रोजच्या ५० हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी शौचालयात फ्लशसाठी वापरले जात आहे. भविष्यात हे पाणी झाडांसाठी वापरले जाणार आहे.

लहान रुग्णालयांना सीटीपी प्लांट अनिवार्य – जैववैद्यकीय कचऱ्याची प्रभावी विल्हेवाट लावण्यासाठी आणि त्याचा पर्यावरणावर होणारा विपरित परिणाम कमी करण्याच्या उद्देशाने पूर्वी सांडपाणी प्रक्रिया केंद्र प्रामुख्याने १०० खाटांपेक्षा अधिक संख्या असलेल्या रुग्णालयांसाठी अनिवार्य होती; परंतु केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने बायोमेडिकल वेस्ट मार्गदर्शन तत्त्वांमध्ये सुधारणा करून लहान रुग्णालयांमध्येही सीटीपी प्लांट बसवणे अनिवार्य केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular