सावर्डे परिसरातील बड्या उद्योजकावर जीएसटी विभागाने फिल्मी स्टाईलने एका कात उद्योजकाच्या घरावर, कार्यालयावर आणि गोदामावर एकाचवेळी छापा टाकला. तेथील महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. सुमारे साडेतीन तास ही कारवाई सुरू होती. चौकशी सुरू असेपर्यंत तेथील उपस्थितांचे मोबाईल जप्त केले होते. या कात व्यावसायिकाची महत्त्वाची कागदपत्रे घेऊन जीएसटी विभागाचे अधिकारी तेथून निघून गेले. केंद्राच्या जीएसटी विभागातील पश्चिम महाराष्ट्रातील अधिकारी छाप्यामध्ये सहभागी होते. केंद्राच्या जीएसटी विभागाचे कार्यालय चिपळूणमध्ये आहे; मात्र चिपळूणमधील अधिकाऱ्यांनाही या छाप्याची माहिती देण्यात आली नव्हती. सांगली, कोल्हापूर आणि सातारा येथील ३५ अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी रात्री चिपळूणमध्ये दाखल झाले. छाप्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना चिपळूणमध्ये जाण्याची सूचना करण्यात आली होती.
चिपळूणचे अधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या अधिकाऱ्यांना मंगळवारी सकाळी कोंडमळा येथे जमण्यास सांगण्यात आले. हे सर्व अधिकारी नियोजित ठिकाणी आल्यानंतर त्यांची तीन पथके तयार केली. एका अधिकाऱ्यामार्फत सर्वांच्या हातामध्ये बंद लखोटा देण्यात आला. लखोटा फोडून त्यामध्ये दिलेल्या पत्त्यावर कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानुसार ३५ अधिकाऱ्यांची टीम सावर्डे भागात गेली. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी कारवाई केली.
या पूर्वी गुजरातच्या ईडीचा आदेश – वनविभागाच्या नाशिक येथील पथकाने काही दिवसांपूर्वी सावर्डे येथे एका कात कंपनीवर छापा टाकला होती. नाशिक येथील सरकारी जंगलातून आणलेला खैराचा साठा आढळला. वनविभागाने त्या कात कंपनीवर सील ठोकून तेथील ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. तसेच या भागातील अन्य व्यावसायिकांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. गुजरातच्या ईडीने दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच सेंट्रलच्या विभागाने कात व्यावसायिकांवर छापे टाकल्यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.