25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriकंपनीच्या निष्काळजीमुळेच वायूगळती झाल्याचा आरोप गुन्हा दाखल करण्याचे आदेश

कंपनीच्या निष्काळजीमुळेच वायूगळती झाल्याचा आरोप गुन्हा दाखल करण्याचे आदेश

आ. उदय सामंत यांनी जिल्हा रुग्णालयात वायुगळतीची बाधा झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.

जयगडमध्ये झालेल्या वायूगळतीमुळे गावकरी आणि आसपासच्या गावांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या वायुगळतीला कंपनीच पूर्णतः जबाबदार असल्याने गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना नसताना देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतलेच का? कंपनीचा निष्काळजीपणा या गॅस गळतीला कारणीभूत असून याप्रकरणी तहसिलदारांना फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आ. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. चौकशीसाठी एक कमिटीदेखील गठित करण्यात आली असून बाधित विद्यार्थ्यांना कंपनीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. दरम्यान, शुक्रवारी आ. उदय सामंत यांनी जिल्हा रुग्णालयात वायुगळतीची बाधा झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. पालकांकडे चौकशी केली. दरम्यान विषारी वायूची बाधा झालेल्यांची संख्या आता ६९ वर पोहोचल्याची माहिती यावेळी आ. सामंत यांनी दिली. दरम्यान शुक्रवारी रात्री उशीरा मिळालेल्या माहितीनुसार २९ मुलांना डिस्चार्ज मिळाला आहे.

मोठ्या प्रमाणावर वायूगळती – गुरुवारी दुपारी १२.३० वा. च्या सुमारास जयगड येथे जिंदाल कंपनीच्या प्रकल्पापासून काही अंतरावर असलेल्या गॅस निर्मिती प्रकल्पाच्या एका प्लॅटमध्ये देखभाल दुरुस्तीचे काम सुरु होते. याचवेळी मोठयाप्रमाणात वायूगळती झाली आणि हा वायू परिसरात पसरला. नजीकच असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना या वायूगळतीची बाधा झाली. मिळेल त्या वाहनातून विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. शुक्रवारी आ. उदय सामंत हे रत्नागिरीत दाखल झाले. त्यांनी थेट जिल्हा रुग्णालय गाठले.

विद्यार्थ्यांची विचारपूस – सध्या ६८ मुले व एक महिला असे मिळून ६९ वायुगळतीचे बाधित रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची वॉर्डमध्ये जाऊन आ. उदय सामंत यांनी विचारपूस केली. तसेच मुलांना डिस्चार्ज देण्याची घाई करू नका, जोपर्यंत. मुलं पूर्णपणे बरी होत नाहीत तोपर्यंत त्यांना डिस्चार्ज देऊ नका, अशा सूचना आं. सामंत यांनी केल्या.

अधिकाऱ्यांची झाडाझडती – जिल्हा रुग्णालयात अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी जीवन देसाई, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन रामानंद, तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, कंपनीचे अधिकारी यांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत आ. उदय सामंत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. ग्रामस्थांनीदेखील कंपनीच्या कारभाराचा पाढाच वाचला.

समिती गठीत – यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. उदय सामंत यांनी सांगितले की, कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली आहे. याची सखोल चौकशी व्हावी यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत डीवायएसपी, प्रांत अधिकारी, बंदर अधिकारी, पर्यावरण विभागाचे अधिकारी आदींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

सुसज्ज हॉस्पिटल कुठे आहे? – ज्यावेळी हा प्रकल्प जयगडमध्ये आला त्यावेळी परिसरात अनेक विकासकामे करण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. या परिसरात सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. मात्र हे हॉस्पिटल आहे कुठे? कंपनीने आश्वासन न पाळल्यामुळेच आज विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला, त्यांना उपचारासाठी रत्नागिरीत हलवण्याची वेळ आली. कंपनीने दिलेली आश्वासन आणि त्याची परिपूर्णता याचा अहवालदेखील समितीने द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

गैरफायदा उठवू नये! – या प्रकरणात कंपनीच जबाबदार आहे, असे वारंवार सांगत आ. उदय सामंत पुढे म्हणाले की, ग्रामस्थांचा कोणताही गैरफायदा या कंपनीने उठवू नये, या बाधित मुलांना नुकसानभरपाई दिलीच पाहिजे आणि थोडीथोडकी नव्हे तर भविष्यातला धोका डोळ्यासमोर ठेवून ही मदत व्हायला हवी असे त्यांनी सांगितले.

मालकाने रत्नागिरीत यावे – आज एवढी मोठी दुर्घटना घडली. यापूर्वी अपघातदेखील घडले. मात्र कंपनीचे मालक पुढे आले नाहीत. त्यांनी पुढे यायला पाहिजे, स्थानिक जनतेशी संवाद साधला पाहिजे, या प्रकरणात कंपनी दोषी आहे. त्यामुळे कंपनीवर गुन्हा दाखला झालाच पाहिजे, असे आ. सामंत यांनी सांगितले.

तहसिलदार तक्रार देणार – वायू दुर्घटना प्रकरणात रत्नागिरीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांना पोलीस स्थानकात तक्रार देण्याचे आदेश दिले असल्याचे सांगून या तक्रारीनंतर पोलीस रितसर गुन्हा दाखल करून घेतील. पोलिसांचा तपास आणि चौकशी समितीचे अहवाल यातून जो काही निष्कर्ष पुढे येईल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहितीदेखील आ. उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली.

RELATED ARTICLES

Most Popular