21.9 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeChiplunचिपळुणात दिवसात बांधले ५०० बंधारे…

चिपळुणात दिवसात बांधले ५०० बंधारे…

मे महिन्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईची तीव्रताही कमी होणार आहे.

नदी, ओढ्यातील वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी चिपळूण पंचायत समितीने जिल्हा परिषद प्रशासनाच्या आदेशानुसार ‘मिशन बंधारे’ मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत एकाच दिवशी १३० ग्रामपंचायतींत ५०० बंधारे उभारण्यात आले. श्रमदानातून उभारलेल्या बंधाऱ्यांमुळे आर्थिक बचतही झाली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी प्रत्येक तालुक्यात मिशन बंधारे मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत जल या थीमचे काम तालुक्यात प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यासाठी गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींची बैठक घेत बंधाऱ्यांचे नियोजन केले. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी सर्व खातेप्रमुखांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटात पथकाची नियुक्ती केली आहे. प्रत्येक पथकात सर्व विभागाचे विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका प्रभाग समन्वयक, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता यांच्या नेमणुका केल्या.

त्यानंतर १० डिसेंबरला तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींमध्ये मिशन बंधारे मोहिमेअंतर्गत एक दिवस बंधाऱ्याकरिता ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी-माजी पदाधिकारी सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, उमेद समूहातील महिला, अंगणवाडी सेविका, मदतनीस, जिल्हा परिषद शाळा, विद्यालय व महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, गावातील तरुण मंडळे, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. नाम फाउंडेशन, एक्सेल इंडस्ट्रिज लोटे, घरडा कृषी संशोधन केंद्र, लवेल, टीडब्ल्यूजे फाउंडेशन, अर्थ फाउंडेशन, यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्यात आली. मिशन बंधारे मोहिमेत तालुक्यात लोकसहभाग व श्रमदानातून विजय बंधारे २०१, वनराई बंधारे ५२, कच्चे बंधारे २२० असे एकूण ४७३ बंधारे बांधण्यात आले. तालुक्यात एकूण ५२५ बंधारे पूर्णत्वास गेले आहेत. या वेळी कृषी विकास अधिकारी सुनील खरात, जिल्हा कृषी अधिकारी मुळीक यांनी सावर्डे येथील बंधाऱ्याला भेट देत मार्गदर्शन केले.

२५ लाखांची बचत – बंधारे श्रमदानातून बांधण्यात आल्यामुळे प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे सुमारे २५ लाख रुपयांची बचत झाली आहे. तसेच मे महिन्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईची तीव्रताही कमी होणार आहे. पाणी अडवल्यामुळे किनारी भागातील विहिरींची पाणीपातळी स्थिर राहते. काही विहिरींचे पाणी मे महिन्याच्या अखेरपर्यंत वापरण्यासाठी मिळते तसेच बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग नियमित वापरासाठीही केला जातो.

RELATED ARTICLES

Most Popular