30.8 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriगुहागरातील ३०० नौकांवर 'ट्रान्सपॉन्डर' - मस्य विभाग

गुहागरातील ३०० नौकांवर ‘ट्रान्सपॉन्डर’ – मस्य विभाग

जिल्ह्यासाठी सुमारे दोन हजार उपकरणे मिळणे अपेक्षित आहेत.

मासेमारीसाठी मच्छीमारी नौका खोल समुद्रात जातात. अनेकवेळा समुद्रात अचानकपणे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यामुळे खोल समुद्रात मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ मदत मिळत नाही. या उद्देशाने मासेमारी नौकांवर ट्रान्सपॉन्डर हे उपकरण बसविण्यात येणार आहे. याद्वारे तत्काळ संदेश पाठवून मदत मिळविणे सोपे होणार आहे. याचे उद्घाटन पडवे येथून झाले आहे. पडवे बंदरात लहान-मोठ्या १३० मासेमारी करणाऱ्या परवानाधारक बोटी आहेत. त्यापैकी ६ सिलिंडरच्या बोटींवर ट्रान्सपॉन्डर हे उपकरण बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. आग लागणे, नौकेचे इंजिन खराब होणे किंवा नौका समुद्रात बुडत असल्यास खलाशांना वैद्यकीय मदत लागल्यास या उपकरणाद्वारे संदेश पाठवता येतो. ट्रान्सपॉन्डर उपकरणातील आपत्कालीन बटन हे थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क करते. त्यामुळे नियंत्रण कक्षाला बोटीच्या समुद्रातील स्थळाची माहिती नियंत्रण कक्षाला मिळते. त्यानुसार नौकेवरील नभमित्र अॅपद्वारे नियंत्रण कक्षाकडून संदेश पाठविला जातो.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील सागरी मासेमारी नौकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत मच्छीमारांना तातडीने मदतकार्य करता यावे, यासाठी ट्रान्सपॉन्डर्स ही उपकरणे उपलब्ध झाले आहेत. नौकांचा ठावठिकाणा समजण्यासाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे. केंद्र सरकारकडून यापूर्वी सागरी मच्छीमारांसाठी व त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना मंजूर आहेत. यापैकीच असणारी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे. विशेष करून कोकणातील मच्छीमारांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. मच्छीमारांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी केंद्र शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. विशेष करून त्यांच्या सागरी सुरक्षेबाबत शासनाने मत्स्यसंपदा योजनेतून बरेच आर्थिक सहकार्य केले आहे. आता याच योजनेतून मच्छीमारांना ट्रान्सपॉन्डर हे उपकरण मोफत उपलब्ध झाले आहेत. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी तीनशे ट्रान्सपॉन्डर्स उपलब्ध झाले आहेत. मच्छीमारांना ट्रान्सपॉडर हे उपकरण मोफत उपलब्ध होणार आहे.

पडवे बंदरातील नौकांवर ट्रान्सपॉन्डर बसविण्याचे काम सुरू झाले आहे. गुहागर कार्यक्षेत्रातील नौकांवर बसविण्यासाठी ३०० ट्रान्सपॉन्डर उपकरण उपलब्ध झाली आहेत. पडवेनंतर इतर बंदरांतील नौकांवर हे उपकरण बसविण्यात येणार आहे. त्यासाठी मच्छीमारी संस्था व नौका धारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गुहागर मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी केले आहे.

जिल्ह्याला दोन हजार उपकरणे – रत्नागिरीत जिल्ह्यातील सर्वच मच्छीमारी नौकांवर ट्रान्सपॉन्डर्स उपकरण बसविण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी सुमारे दोन हजार उपकरणे मिळणे अपेक्षित आहेत. पहिल्या टप्प्यात सहाशे उपकरणे मत्स्य विभागाला प्राप्त झाली आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular