तालुक्यातील पांगरे येथील चिंचवाडी धरणावरून ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे जलजीवन मिशन योजनेतून प्रादेशिक नळपाणी योजना राबवण्यात येत आहे. त्यामुळे १३ गावांतील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे; मात्र या योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याची तक्रार ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्याच्या पाणीटंचाई आराखडा आढावा बैठकीत केली. तसेच याला ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. पंचायत समिती किसानभवन सभागृहात आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पाणीटंचाई आढावा आणि जलजीवन मिशन योजना आढावा बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेच्यावेळी चिंचवाडी धरणावरून राबवण्यात येत असलेल्या प्रादेशिक नळपाणी योजनेच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. याप्रसंगी प्रादेशिक नळपाणी योजनेसंबंधित अधिकाऱ्यांनी या योजनेचे काम सुरळीतपणे चालू असून, ५७ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. यावर भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अरविंद लांजेकर यांनी आक्षेप घेत प्रशासनाला धारेवर धरले. या योजनेचे काम रखडल्याची माहिती त्यांनी दिली.
कोंढेतड येथील ग्रामस्थ गेल्या दोन वर्षांपासून अर्जुना नदीचे गढूळ पाणी पित असून, या संदर्भात अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही कोणतीही कार्यवाही करत नाहीत. १३ गावांसाठी राबवण्यात येत असलेल्या पांगरे प्रादेशिक नळपाणी योजनेला काही गावांमधून विरोध होता; मात्र कोंढेतड ग्रामस्थांनी सकारात्मक भूमिका घेत दोन वर्षांपूर्वी पाण्याच्या साठवण टाकीसाठी जागा दिली. तिथे अद्याप कोणतेही काम सुरू नसल्याचे लांजेकर यांनी सांगितले. ससाळेच्या सरपंच शोभा तांबे यांनी शासकीय जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या साठवण टाकीसाठी प्रशासकीय मंजुरी अडथळा ठरत असून, लवकरात लवकर ही समस्या दूर करावी, अशी मागणी केली. यावेळी पांगरेच्या सरपंच वैष्णवी कुळये, भरत लाड, प्रकाश कुवळेकर यांनीही या चर्चेमध्ये सहभाग घेतला. या वेळी आमदार सामंत यांनी १३ गावांतील अडचणी जाणून घेत संबंधित समस्यांवर योग्य तो तोडगा काढून ही योजना ३१ मार्चपूर्वी कार्यान्वित होईल, अशी ग्वाही दिली.