22.7 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriवायूगळतीला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ अटक करा, अन्यथा आंदोलन

वायूगळतीला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ अटक करा, अन्यथा आंदोलन

उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी कारवाईची मागणी केली.

कंपनीला एवढी मस्ती कसली चढलेय ? स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांनी तक्रारी करून देखील प्रशासनासह कंपनीने दुर्लक्ष केले. म्हणूनच वायू गळतीसाररखा प्रकार घडला. अजूनही ठोस पावले उचलली नाहीत तर भोपाळ वायू गळतीसारखी भीषण दुर्घटना घडेल. या दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्याला अटक न झाल्यास शिवसेना एवढे तीव्र आंदोलन करेल की ही कंपनी बंद पाडायला भाग पाडू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी यांनी दिला आहे. जयगड येथील जिंदाल कंपनीजवळ झालेल्या वायू गळतीनंतर त्या परिसरात एकच हाहाकार उडाला. १२ डिसेंबरला ही दुर्घटना घडली. सकाळच्या वेळेस शाळा भरलेली असताना दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास वायू गळती झाली. त्याचा त्रास परिसरातील विद्यार्थ्यांना झालाः अनेकांचा श्वास गुदमरला, या वायूमुळे गुदमरलेले विद्यार्थी लादीवर कोसळले आणि सारी पंचक्रोशी शाळेच्या दिशेने धावली.

१५० च्या वर बाधित – आतापर्यंत या वायूगळतीमध्ये जवळ जवळ १५० विद्यार्थ्यांसह काही ग्रामस्थांना बाधा झाली आहे. मात्र बाधितांची माहिती बाहेर येऊ नये म्हणून काही खासगी रूग्णालयांचा आसरा घेण्यात आला. मात्र हा सारा प्रकार उघडकीस आला आणि त्या कंपनीची अक्षरशः स्थानिक ग्रामस्थांनी लक्तरेच वेशीवर टांगली.

केवळ गुन्ह्याचा फार्स – या प्रकरणात ना. उदय सामंत यांनी बैठक घेऊन चौकशी समितीची घोषणा केली. तसेच तहसीलदारांमार्फत फिर्याद देऊन गुन्हा दाखल करायला लावला. मात्र प्रत्यक्षात कारवाई होणार कधी? हा गुन्हा म्हणजे केवळ फार्सच म्हणावे की काय? असा सवाल आता जयगड येथील संतप्त ग्रामस्थ करीत आहेत.

तेरी भी चूप, मेरी भी चूप – एवढी मोठी गंभीर दुर्घटना घडली मात्र अद्याप त्यावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. सत्ताधारी असोत वा विरोधक असोत किंवा प्रशासन असो. साऱ्यांचीच भूमिका तेरी भी चूप और मेरी भी चूप अशीच आहे. या भूमिकेबाबत नेमके म्हणावे तरी काय? यात कोणते गौडबंगाल तर नाही ना? असा संशय उत्पन्न करणारी चर्चा परिसरात सुरू आहे.

ठाकरे गट आक्रमक – या दुर्घटने विरोधात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठोस उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचलले नाही तर भोपाळ वायू गळतीसारखी भीषण दुर्घटना घडेल अशी भीती व्यक्त करून त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह प्रशासनालादेखील खणखणीत इशारा दिला आहे.

अजून किती जीव घेणार : बंड्या साळवी – यावेळी बोलताना तालुकाप्रमुख बंड्या साळवी म्हणाले की, अजून कितीजणांचे जीव कंपनी घेणार आहे. जयगड येथून जी ओव्हरलोड वाहतूक होते, क्षमतेपेक्षा जादा माल नादुरूस्त वाहनातून नेण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे वाहनांचे ब्रेक लागत नाहीत आणि जयगड ते निवळी मार्गावर वारंवार अपघात होऊन स्थानिकांचे जीव जात आहेत.

आरटीओ करतेय काय ? – ते पुढे म्हणाले की, स्थानिक वाहन धारकांवर मात्र आरटीओ लगेच कारवाईचा बडगा उगारते पण जयगड येथून सुरू असलेली ओव्हरलोड वाहतूक आरटीओच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का? ही ओव्हरलोड वाहतूक तात्काळ बंद झाली पाहिजे अन्यथा शिवसेना स्टाईल उत्तर देऊ असा इशारा तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी दिला आहे.

अटक करा – यावेळी तालुकाप्रमुख बंड्या साळवी कमालीचे संतापले होते. एवढी मोठी दुर्घटना घडली. केवळ एफआयआर दाखल करता? तात्काळ अटक करा. ज्या अधिकाऱ्यामुळे हा प्रकार घडला त्या अधिकाऱ्याला तात्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – या प्रकरणात शुक्रवारी शिवसेनेच्या उपजिल्हाधिकारी शिष्टमंडळाने चंद्रकांत सूर्यवंशी यांची भेट घेतली. उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी कारवाईची मागणी केली. जर कारवाई झाली नाही तर एवढे तीव्र आंदोलन करू की कंपनी बंद पाडायला भाग पाडू असा इशाराच त्यांनी यावेळी दिला..

RELATED ARTICLES

Most Popular