26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriनिवळी पुलाचा मुद्दा गडकरींच्या कोर्टात, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण

निवळी पुलाचा मुद्दा गडकरींच्या कोर्टात, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण

निवळी येथील उड्डाणपुलासाठी १२ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या आरवली ते वाकेड या दोन टप्प्यांच्या कामाने वेग घेतला आहे. दोन्ही टप्प्यातील कामे ६५ टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहेत. महामार्गातील पुलांच्या कामाने गती घेतली आहे. त्यात निवळी येथील उड्डाणपुलाच्या प्रश्नावरून ग्रामस्थ व व्यापाऱ्यांत नाराजीचा सूर आहे. ग्रामस्थ व ग्रामपंचायतीला पूल हवा आहे आणि व्यापाऱ्यांना नको असल्याने राजकीय हस्तक्षेपासाठी प्रयत्न सुरू आहेत. महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी याचा चेंडू आता केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या कोर्टात टाकला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यात रखडले आहे. यातील आरवली ते तळेकांटे आणि तळेकांटे ते वाकेंड ही कामे विशेषकरून रखडली होती. यात संगमेश्वर शास्त्री नदीवरील पूल, महामार्गाच्या कामाचा आरंभ झालेला सप्तलिंगी पूल, बावनदी, आंजणारी या नद्यांवरील कामेही रखडली होती. त्याचप्रमाणे निवळी, हातखंबा, पाली व लांजामधील उड्डाणपुलांची कामेही थांबली होती; परंतु लोकसभा निवडणुकीनंतर या सर्व कामांनी वेग घेतला आहे. आरवली ते तळेकांटे दरम्यानचे काम म्हात्रे कंपनीकडे सोपवले आहे.

गतवर्षी या भागात ३० टक्केच काम झाले होते. आता जवळपास ६५ टक्क्याच्या आसपास काम झाले आहे. या भागात कामाने मोठा वेग घेतला आहे. आणखी एका टप्प्यातील तळेकांटे ते वाकेडचे काम इगल कंपनीकडे सोपवले आहे. या भागात ३१ टक्के काम झाले होते ते आता ७४ टक्क्यांपर्यंत झाले आहे. रस्त्यांच्या कामांनी वेग घेतला असून, चौपदरीकरणाचे काम मे २०२५ पर्यंत पूर्ण करायचे आहे तर पुलांची कामे नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करायची आहेत. दोन्ही टप्प्यातील पुलांची कामेही वेगाने सुरू आहेत. रत्नागिरीतील निवळी येथील पुलाचे कामही सुरू झाले आहे. ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने या ठिकाणी पूल व्हावा म्हणून प्रयत्न केले होते; परंतु परिसरातील व्यापारीवर्गाने मात्र पुलामुळे बाजारपेठेचे महत्त्व कमी होणार असल्याने पूल नको, अशी भूमिका घेतली आहे. यासाठी ते नुकतेच रस्त्यावर उतरले होते. याबाबत खासदार नारायण राणे यांचीही त्यांनी भेट घेतली. आमदार किरण सामंत यांच्याशीही चर्चा केली आणि माजी पालकमंत्र्यांच्या कानावरही पूल नको अशी मागणी घातली; परंतु अनेक ग्रामस्थांची शेती व बागा रस्त्याच्या दुतर्फा असल्याने जनावरांची ने-आण करण्यासाठी पूल फायदेशीर ठरणार असल्याने ग्रामस्थांना पल हवा आहे.

बारा कोटींचा पूल… – राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांकडे दोन्ही बाजूने मागण्या दिल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पुलाबाबतचा निर्णय आता केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या कोर्टात टाकला आहे. निवळी येथील उड्डाणपुलासाठी १२ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. या पुलाबाबत काय निर्णय होतो, याकडे निवळीवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular