25.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriजिल्ह्यातील तरुणांचे स्थलांतर कायम, स्वयंरोजगारापेक्षा नोकरी बरी

जिल्ह्यातील तरुणांचे स्थलांतर कायम, स्वयंरोजगारापेक्षा नोकरी बरी

जिल्ह्यातील तरुणांच्या स्थलांतरित होण्याचे प्रमाण आजही थांबलेले नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील युवावर्ग अधिकाधिक आत्मनिर्भर बनावा यासाठी शासकीय पातळीवर विविध कार्यक्रम सुरू आहेत. यामधून जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते; परंतु त्याचा तितकासा फायदा होतोच असे नाही. तरुणांनी स्वयंरोजगारातून आत्मनिर्भर बनले पाहिजे. त्यात येणारे विविध अडथळे, आर्थिक नियोजन, व्यवसायासाठी आवश्यक प्रशिक्षण यावर प्रकाश टाकणारी मालिका आजपासून…! जिल्ह्यातील तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वयंरोजगारातून आपला विकास साधावा, यासाठी जिल्हा उद्योगकेंद्राच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. तरीही स्वयंरोजगारापेक्षा नोकरी बरी, अशी धारणा येथील तरुणांची झाली आहे. त्यामुळे अनेक तरुण नोकरीसाठी मोठ्या शहरात आणि विदेशात स्थलांतर करत असल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे अर्थकारण पूर्वी मुंबईसारख्या मोठ्या शहरावर अवलंबून होते. पूर्वीच्या काळात मुंबई हे शहर भारताचे ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जात होते.

मुंबईत मोठ्या प्रमाणात कापड व्यवसाय असल्यामुळे गिरणी कामगार रोजगारासाठी मुंबईत स्थिरावत होते. कालांतराने मुंबईतील गिरणी व्यवसाय बंद पडला आणि पुढच्या पिढीने वेगवेगळ्या व्यवसायाकडे मोर्चा वळवला. रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषित झाला असला तरीही त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग म्हणावे तेवढे सुरू झालेले नाहीत. त्यामुळे स्वयंरोजगारातून जिल्ह्यात म्हणावी तेवढी रोजगारनिर्मिती झाली नाही. येथील मतदारांनी राज्यकर्त्यांकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत; मात्र त्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत. कोकणचा ‘कॅलिफोर्निया’ हा कित्येक वर्षांत निवडणुकीचा मुद्दा होता; परंतु जिल्ह्यात प्रदूषणकारी प्रकल्प होऊ घातल्यामुळे येथे अनेक वाद पुढे आले आहेत. या वादातून एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांच्या स्थलांतरित होण्याचे प्रमाण आजही थांबलेले नाही.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातून जिल्हाभरात वर्षभर विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून उद्योजकता विकासासाठी प्रयत्न केले जातात. या केंद्राच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रमासह अर्थसाहाय्य, कच्चा माल, बाजारपेठ याबद्दलचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन विभागातर्फे केले जाते. त्याकडे तरुणाने पाठ फिरवली आहे. उद्योग उभारणीसाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण आवश्यक असते. ग्राहकांचे समाधान हे उद्योगवाढीचे महत्वाचे सूत्र असल्यामुळे त्यासाठी परिपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रत्येकजणं शोध घेतात. जिल्हा उद्योगकेंद्रामार्फत काही सशुल्क तर काही संपूर्ण मोफत प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. काही गृहोद्योग तसेच अनेक सेवा उद्योगही करता येतात. त्याकडे तरुणांचा फारसा कल नाही. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक साधनसामुग्रीवर आधारित पर्यटन, मत्स्य व्यवसाय व सुक्ष्म उद्योगांचा विकास करण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध ही पथदर्शी योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला.

RELATED ARTICLES

Most Popular