वायू गळतीच्या घटनेनंतर तूर्तास बंद केलेली एलपीजी वाहतूक जिंदल पोर्ट कंपनीला सुरू करण्याची परवानगी दिल्याच्या वृत्ताने संतप्त ग्रामस्थ आज सायंकाळी रस्त्यावर उतरले. जिंदल कंपनीच्या समोरील रस्त्यावर उतरून वाहतूक रोखली. या प्रकारामुळे प्रशासनाने ग्रामस्थांना वाऱ्यावर सोडल्याची भावना व्यक्त केली असून दुर्घटनाग्रस्त विद्यार्थ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी जिंदलच्या पोर्ट विभागात झालेल्या वायू गळतीमुळे जवळपास ८० हून अधिक विद्यार्थ्यांना त्रास झाला होता. यामुळे जयगड पंचक्रोशीत पालक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. प्रशासनाने पोर्टवरुन एलपीजी वाहतुकीला बंदी घातली होती. या घटनेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली आहे. या कमिटीला आठ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या; परंतु महिना व्हायला आला तरी समितीने अहवाल प्राप्त झालेला नाही.
त्यातच जिल्हाधिकाऱ्यांनी एलपीजी वाहतुकीला परवानगी दिल्याचे वृत्त आहे. जिंदल पोर्ट येथून पुन्हा एलपीजी वाहतूक सुरू झाली असल्याचे समजताच ग्रामस्थांमध्ये पुन्हा उद्रेक झाला. कंपनी ग्रामस्थांच्या जखमांवर मीठ चोळत असल्याचा आरोप करीत आज सायंकाळी ग्रामस्थ व पालकांनी जिंदल कंपनी आणि पोर्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिय्या दिला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेमुळे जयगड पंचक्रोशीत जिंदल विरोधात जोरदार नाराजीच्या भावना उमटत आहेत. घटनेनंतर जयगड पोलिस निरीक्षकांसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गेटसमोर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईणकर यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली.