संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथे असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे ३० खाटांवरून ५० खाटांच्या सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी आमदार शेखर निकम यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. देवरूख रुग्णालय हे नगर पंचायत क्षेत्रात असून, मध्यवर्ती ठिकाणी आहे. येथे वाढती लोकसंख्या आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव पाहता रुग्णांना रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई किंवा मिरज येथे हलवावे लागते. यामुळे रुग्णांच्या वेळेची आणि आर्थिक हानी होत आहे. मुंबई-गोवा व कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील अपघातांमध्ये गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे रुग्णांचे प्राण धोक्यात येण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा स्थितीत देवरूख ग्रामीण रुग्णालयाचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर होणे अत्यावश्यक आहे.
हा प्रस्ताव मंत्रालयीन स्तरावर असून, आमदार निकम यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक आरोग्यमंत्री आबिटकर यांनी प्रस्तावाबाबत सकारात्मक चर्चा केली आहे. हा निर्णय झाला तर स्थानिक जनतेला आणि अपघातग्रस्तांना तत्काळ आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार आहेत. संगमेश्वर तालुक्यातील आरोग्यसुविधांचा दर्जा उंचावण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे. या प्रकल्पामुळे देवरूख भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळतील तर रुग्णांची आर्थिक बचत होऊन गंभीर परिस्थिती टाळता येईल. आमदार निकम यांचा हा निर्णय आरोग्यसेवेत नव्या युगाची सुरवात ठरेल.
रिक्त पदेही भरणार – रुग्णालयासाठी आवश्यक डॉक्टर, रिक्त पदे तसेच इतर कर्मचारीवर्ग याच्या भरतीसंदर्भात व आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत चर्चा करण्यात आली. इतर रुग्णालयाविषयक प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून लवकरच देवरूख रुग्णालय सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय म्हणून कार्यरत होईल, असे आमदार निकम यांनी सांगितले.